Home » विशेष लेख » बाबा माफ करा – तुम्ही आम्हाला समजलाच नाहीत .

बाबा माफ करा – तुम्ही आम्हाला समजलाच नाहीत .

बाबा माफ करा – तुम्ही आम्हाला समजलाच नाहीत
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी होत असताना उद्धारली कोटी कुळे भीमा तुमच्यामुळे _ हे वाक्य वाचत असताना भीमा तुझ्या मताचे जर का पाच लोक असते – हे वाक्य मात्र वेदना देवून जाते. जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायचं आहे. हे तुमच वचन पाळण्यात आम्ही किती यशस्वी झालोत ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. दिल्लीच्या तक्तावर तुमच्या विचाराचा एक भीम सैनिक जावून गळ्यात जाणवे घालून आम्ही कसे हिंदू आहोत हे सिद्ध करण्यासाठी धडपडतो आहे. एक बाबासाहेब शिकला . माझ्यासारखे अनेक बाबासाहेब झाले तर भारतातला सर्व अस्प्रश्य्तेचा प्रश्न मिटून जाईल. हा तुमचा विश्वास खरच यशस्वी झाला आहे का ? शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हि तुमची शिकवण आम्ही मात्र ज्या पद्धतीने घेतली त्यामध्ये आम्ही नक्की काय शिकलो याचा विचार करण्याची वेळ आली आहे . त्यामुळे संघटीत होण्याचे तुमचे स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही. संघर्षाच्या ठिणग्या अधून मधून झडतात मात्र त्याचा सर्वात जास्त त्रास तुमच्याच विचारच्या लोकांना भोगावा लागतो. राजकारणाच्या पलीकडे जावून आम्ही तुम्हाला समजून घेवू शकलोत का ? या बाबत आम्ही कधीच गंभीर झालो नाहीत. बाबा तुमची शिकवण मानव मुक्तीची होती त्यामध्ये माणसाला माणूस पण देण्याचे . समता वादी समाज व्यवस्था निर्माण करण्याची स्त्री- पुरुष समानता . निसर्गात प्राणी व पशूना जो न्याय आहे तो माणसाला का नसावा ? असा तुमचा प्रश्न चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून पाण्यासारखाच जीवनदायी ठरला होता. तुमची जयंती आमच्यासाठी उत्सवच . मात्र आंबेडकरवादी कोण ? असा नवा वाद कधी कधी अनुभवायला येतोय. जगातल्या विद्वानापैकी आपण एक, पण बाबा तुम्हुला सुद्धा आम्ही जात किती चीटकवली. महराष्ट्रात तर आम्ही आंबेडकरवादी आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपल्या जातीवाल्याकडून आम्हाला एन ओ सी घ्यावी लागते. सत्तेसाठी तुमचा समर्थक कोणत्याही पक्षात गेला तरी चालतो. ओबीसी चे पोर मात्र इतर पक्षात असताना आंबेडकरवादी का होत नाही ? बाबा तुम्हीच म्हणाला होतात राजकारण हि गुरुकिल्ली आहे, तिच्या सहायाने कोणत्याही सत्तेचे कुलूप उघडता येईल हे सांगताना कोणत्या पक्षात जावे ? हि गुरुकिल्ली कोणत्या पक्षाकडून घ्यायची हे मात्र तुम्ही आम्हाला सांगितले नव्हते. बाबा असे कोणते क्षेत्र आहे ज्या विषयावर तुम्ही आम्हाला रस्ता दाखविला नाही. १९३८ ला देशाला कुटुंब नियोजनांचे महत्व सांगणारे आपण १०० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या कथा व व्यथा मांडणारे पुस्तक तुम्ही लिहिले होते. एकीकडे १९४२ ला संपूर्ण देशात चलेजाव ची चळवळ चालू असतना तुम्ही मात्र जलसाक्षरता, उर्जा साक्षरता याचे महत्व सांगून १०० वर्षांचा भारत कसा असेल हे सांगत होतात. तुम्हीच मुंबई च्या विधान मंडळात सुचवलेल्या अनेक सूचना आम्ही मान्य केल्या असत्या तर आज शेती मालाला योग्य बाजार भाव व सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळवून शेतकरी सुखी झाला असता. १९२९ ला शेतकऱ्यांची शेतकरी परिषद घेवून विधान मंडळावर काढलेला पहिला मोर्चा हा दलितांच्या प्रश्नासाठी नव्हे तर जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी होता. हे बाबा आम्हाला का कळत नाही ? १९३२ ला आपणच कसनाराला जमीन मिळाली पाहिजे म्हणून खोती रद्द करण्याचे विधेयेक मांडले. त्यावर एक पुस्तक लिहिले नं भक्तांना माहित नं विरोधकांना. small holdings in india and their remedies. १९२८ ला बाबा तुम्हीच स्टार्ट कमिटीला सांगितले होते कि देशातल्या ओबीसींना घटनात्मक दर्जा द्या. ओबीसी च्या कल्यासानासाठी सरकार योग्य पावले उचलत नाही म्हणून तुम्ही कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिलात. एवढेच नाही तर १९४६ ला शुद्र कोण होते हे पुस्तक लिहून आमच्या परंपरेची जाणीव आम्हाला करून दिलीत, स्त्रियांच्या प्रगतीवरून देशाची प्रगती मोजता येते असे तुम्ही सांगत राहिलात. देशाचे उर्जा मंत्री, पाटबंधारे मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, विमान वाहतूक खात्याचे मंत्री म्हणून आपण काम करताना देशातली पहिली १५ धरणे बांधलीत. नदी जोडण्याचा प्रकल्प हि संकल्पना मांडून कायमचा दुष्काळ हटविण्याची योजना, सारा देश रस्त्यांनी जोडला पाहिजे, भारताला विकास हवाय, वीज, सडक, पाणी हे त्रि- सूत्र आपण मांडत राहिलात तरी सुद्धा आम्ही तुम्हाला महापुरुषांच्या यादीत बसवीत असताना दलीतापुरते सीमित करीत आहोत. हा आमचा करंटेपणा नाही का ?
बाबा तुम्ही आम्हाला माफ करा तुम्हाला समजून घ्यायला आम्हाला वेळ लागेल……….जयंती निम्मित विनम्र अभिवादन
दादासाहेब मुंडे

Leave a Reply

Your email address will not be published.