लातूर-उस्मानाबाद-बीडची निवडणुक राकाँ लढवणार-पवार.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
उमेदवाराबध्दल अजूनही गुप्तता.
तीन आठवड्यांवर मतदान आलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच तशी घोषणा ही केली आहे. मात्र उमेदवारी कोणाला याची गुप्तता राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही पाळली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या याभुमिकेमुळे गेली चाळीस वर्षापासून या मतदारसंघावर असलेली कॉंग्रेसची सत्ता संपुष्टात येणार आहे. आता राष्ट्रवादीच्या या भुमिकेवर कॉंग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पुर्वीच्या मराठवाडा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विभाजन होऊन लातूर-उस्मानाबाद-बीड अशा तीन जिल्ह्यांचा हा मतदारसंघ झाला. यामध्ये एकदा बीडचे दिवंगत लोकनेते बाबुराव आडसकर, उस्मानाबाद जिल्ह्याचे नरेंद्र बोरगावरकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मागच्या अठरा वर्षांपासून माजी मंत्री दिलीपराव देशमुख इथून निवडून आले.
दरम्यान, ज्या पक्षाचा आमदार त्यांचाच उमेदवार या कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील सुत्रानूसार या जागेवर दावा सांगितला जात होता. मात्र, दिलीपराव देशमुख उमेदवार असतील तर जागा सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखविली होती. दिलीपराव देशमुख यांनी प्रकृतीच्या कारणाने निवडणुक लढविण्यास नकार दिल्याने ज्यांची ताकद त्यांची जागा या नव्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीने आता दावा सांगितला आहे.
तिकडे या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी कॉंग्रेसचे नेते आजही मुंबईत तळ ठोकून आहेत. जागा वाटपाबाबत शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात चर्चा झाली असली तरी तोडगा निघाला नव्हता. मात्र, यावेळी आमची ताकद अधिक असल्याने आम्हीच जागा लढवणार असे खुद्द शरद पवारांनीच स्पष्ट केले आहे. याबाबत राष्ट्रीय अध्यक्षांशी बोलल्याचेही त्यांनी नमूद केल्याने राष्ट्रवादीच ही जागा लढविणार हे स्पष्ट झाले आहे.
दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्याने कॉंग्रेसपेक्षा जास्त ताकद असतानाही सौदहार्याच्या भूमिकेतून मागच्या वेळी त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्यासाठी ही जागा सोडली होती असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले. तसे, या मतदार संघातील आघाडीच्या मतांच्या आकड्यांवर नजर टाकली तर कॉंग्रेसची दोनशेच्या जवळपास तर राष्ट्रवादीची तीनशेच्या जवळपास मते आहेत. शंभर मतांचा फरक असल्याने राष्ट्रवादीने या जागेवर दावा सांगितल्याचे समजते.
