जेव्हा बोलायचे असते तेव्हा मोदी बोलत नाहीत -पवार
पुणे / डोंगरचा राजा आँनलाईन
युपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मौनी पंतप्रधान म्हणून हिणवले गेले. सध्याचे पंतप्रधान नेहमीच बोलताता. मात्र, जेव्हा बोलायची गरज असते तेव्हा ते गप्प राहतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.
पवार म्हणाले, उन्नावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाला. यातील आरोपीला तत्काळ पकडण्यात आले नाही, कारण तो सत्ताधारी पक्षाचा होता. मात्र, समाजातून उठाव झाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. तत्पूर्वी न्याय मागणाऱ्या मुलीच्या वडिलांना अटक करुन त्यांना मृत्यू येईल अशी वागणूक देण्यात आली. तसेच कथुआत अत्याचार करणाऱ्यांना अटक केल्याने त्यांना सोडण्याची मागणी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत सत्ताधारी लोकांनी केली. अत्याचार केलेल्यांना सोडावं यासाठी ते रस्त्यावर उतरले, यावरून त्यांचा स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन कळतो, अशा प्रकारे अत्याचार करायचा वर पीडितांवरच अन्याय करायचा यासारखे राज्यकर्ते देशात आपण कधी पाहिले नव्हते.त्यामुळे अत्याचारग्रस्तांच्या पाठीशी आपण उभे रहायला हवे. त्यासाठी आपण नेहमीच सतर्क राहिले पाहिजे. जनता अत्याचारग्रस्तांना संरक्षण देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी भुमिका घेण्याची गरज आहे. आपण राजकारणात आहोत मात्र, त्यासाठी समाजाकरणही महत्वाचे आहे, असा सल्ला यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.
देशात बेरोजगाराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्या पिढीत नैराश्य आले आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी मजल्यांवरून उडी घेतल्याची, एकतरी बातमी ऐकायला मिळतेय हे आता नित्याचेच झाले आहे. आपण अशा सामान्य माणसांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कायदा सुव्यस्थेची काळजी घेतले पाहिजे, असे यावेळी शरद पवार म्हणाले.
ज्या नीरव मोदी आणि त्याच्यासारख्यांमुळे बँका अडचणीत आल्या, या बँकांचे नुकसान भरु काढण्यासाठी सरकारने ८६ हजार कोटी रुपये बँकांमध्ये भरले. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यांच्याकडे पैसा नाही. बँकांना बुडवून पळून गेलेल्यांना धरुन आणण्यासाठी सरकारने कायदा केला मात्र, आता त्याची अंमलबजावणी होतेय का ते पाहू असे पवार म्हणाले. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जनमत घेण्याच्या दृष्टीने आपण हल्लाबोल यात्रेसाठी मेहनत घेत आहात, अशा शब्दांत नेत्यांचे कौतुक करताना पवार म्हणाले, संघटनेमध्ये नव्या चेहऱ्यांना अधिक संधी द्या. पदाधिकाऱ्यांमध्ये महिला, दलित, आदिवासी, ओबीसी यांचा प्रामुख्याने समावेश कसा करता येईल याकडे लक्ष द्या. याद्वारे आपला सर्वसमावेशक चेहरा दाखवून द्या
