Home » क्राईम स्टोरी » बलात्कारी आसारामला जन्मठेप.

बलात्कारी आसारामला जन्मठेप.

बलात्कारी आसारामला जन्मठेप.
-शिल्पीला २० वर्षांचा कारावास
डोंगरचा राजा | Updated
बलात्कारी आसाराम बापूला जन्मठेप, शरद व शिल्पीला २० वर्षांचा कारावास
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात बुधवारी जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने आसाराम बापूसह शरद व शिल्पी या दोन आरोपींना दोषी ठरवले असून आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता, ज्याची सुनावणी जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात झाली. वय 77 वर्षे असलेल्या आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायालयाने शरद व शिल्पी या सहआरोपींनाही प्रत्येकी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा ऐकल्यानंतर आपले उर्वरीत आयुष्य तुरुंगातच जाणार याची कल्पना आलेला आसाराम कोर्टात ढसाढसा रडला.

मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व ४ सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. संचिता गुप्ता उर्फ शिल्पी ही या दुर्दैवी मुलीच्या हॉस्टेलची वॉर्डन होती तर छिंदवाडातील या आश्रमशाळेचा संचालक होता. शिल्पी व शरदचंद्र यांनी आसारामला या कृष्णकृत्यामध्ये साथ दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाले व त्यांनाही 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.