Home » महाराष्ट्र माझा » निळा,भगवा झेंडा कुटुंबांचा आधार.

निळा,भगवा झेंडा कुटुंबांचा आधार.

निळा,भगवा झेंडा कुटुंबांचा आधार.

डोंगरचा राजा | Updated
झेंडा निळा, भगवा. दीडशे कुटुंबांचा आधार
औरंगाबादेतून राज्यभरात झेंडय़ाला मागणी
झेंडय़ामुळे भलेही वाद निर्माण होत असतील, पण हाच झेंडा दीडशेवर कुटुंबांचा आधार आहे. औरंगाबादेतूनच झेंडे अगदी मुंबई, अमरावती, कोल्हापूर अशा राज्याच्या विविध भागात जात आहेत. या मागणीमुळे अगदी वर्षभर झेंडे तयार करण्याचे काम हाताला मिळते आणि त्यातून कुटुंबाची रोजीरोटी चालते. कोण आहेत या कामात? तर सर्वच धर्म-जातीतील महिला, कुटुंबे. त्यांच्यासाठी झेंडा किती महत्त्वाचा असेल?.. प्रदीप राजेंद्र काथार या तरुणाचा प्रश्न होता.
औरंगाबादच्या जटवाडा भागातील राधास्वामीनगरात राहणारा प्रदीप व त्याचे सर्व कुटुंबीय झेंडा बनवण्याच्या कामात वर्षभर व्यस्त असतात. शुक्रवारी तो जरा निवांत होता. राज्यभरातून आलेल्या मागणीनुसार झेंडय़ाची पूर्तता केलेली होती. त्यामुळे निवांतपण होते त्याच्याकडे. घरात दर पाच-दहा मिनिटाला झेंडा खरेदीसाठी महिला, मुले, तरुण येतच होती. त्यामुळे घरात आहे तो मालही जाणार, याचा त्याला विश्वास. प्रदीप सांगत होता, दरवर्षी शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आमच्यासाठी मोठे उत्सव. या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त भगवे, निळे झेंडे तयार करण्याचे काम वडिलांनी आठ-दहा वर्षांपूर्वी सुरू केले. विक्रीला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून वर्षभराचे नियोजन केले. प्रत्येक जयंतीपूर्वी सहा महिने त्याची तयारी केली जाते. प्रारंभी औरंगाबाद व नंतर मुंबईला झेंडे तयार करून पाठवले जाऊ लागले. नंतर अमरावती, अकोला, नाशिक, नगर, कोल्हापूर अशा अनेक भागातून आमच्या झेंडय़ांना मागणी येऊ लागली आणि कामाची भरभराट सुरू झाली. आज आपल्यासह दीडशे कुटुंब आमच्या झेंडे तयार करण्याच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यात सर्वच जाती-धर्मातील महिला आहेत. घरकाम करून दोनशे-चारशे अगदी आठशे-हजार रुपये रोजही त्या कमवू शकतात, एवढे काम आमच्याकडून त्यांना मिळते.
बीएस्सी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाटय़ शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला प्रदीप पुढे सांगतो,‘ व्यवसायाच्या भरभराटीचे श्रेय वडिलांना आहे. एकेकाळी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती आमची. पण झेंडे तयार करण्याच्या व्यवसायाची संकल्पना वडिलांना सुचली आणि त्यातून आपल्यासह इतरही दीडशे कुटुंबातील महिलांच्या जीवनाला आकार मिळत गेला आहे. भगवा, निळा झेंडय़ासह रुमाल, बाईक स्टॅण्ड, पाण्यानेही धुतले जाईल असे तोरणही विकतो. त्यालाही चांगली मागणी असते. हाताच्या पंजाएवढय़ापासून ते अगदी ४० बाय ५० मीटर एवढा मोठा झेंडा आम्ही तयार करतो.’

घर-घर झेंडय़ाचा नारा ठरला फायद्याचा

मागील दोन वर्षांत झेंडय़ाला अधिकची मागणी वाढलेली आहे. यावर्षी शिवजयंतीला घर-घर झेंडा, असा नारा दिला गेला होता. त्याला प्रतिसाद मिळाला. परिणामी आमच्या झेंडय़ाला मागणी वाढली. असेच वातावरण डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तही आहे. त्यामुळे मागणी चांगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.