Home » महाराष्ट्र माझा »  अंबाजोगाईत रस्ते सुरक्षा अभियानास सुरुवात.

 अंबाजोगाईत रस्ते सुरक्षा अभियानास सुरुवात.

 अंबाजोगाईत रस्ते सुरक्षा अभियानास सुरुवात..
▪ वाहन चालवताना कुटुंबाचा विचार करा : संजीव भोर.
अंबाजोगाई / डोंगरचा राजा 
अतिवेग, चुकीचे ओव्हरटेक, मद्यप्राशन, मोबाईलचा अतिवापर, चालकाला पुरेशी विश्रांती न मिळणे तसेच वातावरणातील बदल आदी कारणांमुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे.शक्यतो दिवसापेक्षा रात्री व पहाटे आठ पटीने जास्त अपघात होतात.यासाठी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण हवे,चुकीचे ओव्हरटेक करू नका,मद्यपान करू नका व मोबाईलवर बोलू नका हे केले तर अपघात होणार नाहीत.असे सांगुन गेल्या वर्षभरात सुमारे दिड लाख लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या,वाहतुकीचे नियम पाळा व कुटुंबाचा विचार करा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले.ते अंबाजोगाईत 29 व्या रस्ते सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रास्ताविक करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात पंधरवाडा तर देशात सप्ताह साजरा करून नागरिकांना रस्ते सुरक्षिततेबाबतची माहिती देण्यात येते.दरवर्षी हा कार्यक्रम जानेवारी महिन्यात व्हायचा परंतु, उत्तरेकडील राज्यात नेमके याच महिन्यात पाऊस व धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने केंद्र शासनाने बहुदा हे अभियान एप्रिल महिन्यात घेतले असावे. केंद्र सरकार 23 एप्रिल ते 30 एप्रिल 2018 या कालावधीत “रस्ते सुरक्षा सप्ताह” तर महाराष्ट्र सरकार 23 एप्रिल 2018 ते 7 मे 2018 या कालावधीत “रस्ते सुरक्षा पंधरवाडा” या माध्यमातून हे अभियान सर्वञ प्रभावीपणे राबवित आहे.अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्याला चालक जबाबदार असतात. अपघातांचे हे प्रमाण कमी व्हावे,मृत्यू होवू नयेत,या देशाची तरूणाई अपघातात आकाली जावू नये या उद्देशानेच हे अभियान राबविण्यात येते असे सांगुन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी अपघातांची विविध कारणेही सांगितली.तसेच दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येकाने “हेल्मेट” घालून व चारचाकी चालविणाऱ्या प्रत्येकाने “सीट बेल्ट” लावूनच वाहन चालवावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बोलताना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी 25 वर्षे ते 30 वर्षे हे वय मृत्यू होण्याचे वय नाही असे सांगुन अपघातात जे तरूण व जी कर्ती माणसे मरण पावतात. त्यामुळे एक व्यक्ती नव्हे तर त्याचे संपुर्ण कुटुंबच उद्धवस्त होते.त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे,ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.त्याचबरोबर या नियमांचे पालन आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील प्रत्येकाला करायला लावणे,हे सुध्दा आपले कर्तव्य आहे. आपल्या मुलगा किंवा मुलीच्या हातात गाडीची चावी देताना त्यांना वाहतूक नियमांची शिकवण देण्याचे कर्तव्य प्रत्येक पालकाने बजावल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.मानवी चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. या नियमांची जनजागृती करण्यासाठी पुढील पंधरा दिवस रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. यामाध्यमातून वाहतूक नियमांच्या पालनाचे महत्व सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.म्हणून “वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा” असे आवाहन करून अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार मिळावेत अशी अपेक्षा देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.तर अंबाजोगाई ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक बी.आर.कांबळे यांनी 90 टक्के अपघात हे मद्यप्रशानामुळे होत असल्याचे सांगुन अपघाताच्या ठिकाणी जखमींना मदत करायची सोडून लोक मोबाईलवर सेल्फी काढण्यात धन्यता मानतात.त्यामुळे घटनेचे गांभिर्य ओळखून सेल्फी काढण्याऐवजी जखमींना तात्काळ मदत करा.108 हा नंबर डायल करा. तात्काळ मदत मिळवा.जखमींना मदत करणार्‍यांना प्रशासन सहकार्य करेल, दोषी धरणार नाही. “जखमींना मदत करा व त्यांचे जीवन वाचवा” असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक बी.आर.कांबळे यांनी केले.अध्यक्षीय समारोप करताना अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी अपघातांची कारणे सांगुन शहरी व ग्रामिण भागात वाहन धारकांची वाढलेली संख्या व वाहने चालविताना घेण्यात येत नसलेली काळजी कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.विशिष्ठ स्पीडच्यावर वाहने चालवु नका.मानवी जीवन अनमोल आहे.रात्री वाहने चालविताना काळजी घ्या.डोळ्यांचे आजार असतील तर शक्यतो रात्री वाहने चालवू नका, जगात दशहतवाद व युद्धापेक्षा रस्ता अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगुन नागरिकांच्या जीवन सुरक्षेसाठी असलेले वाहतुकीचे नियम सर्वांनीच पाळावेत असे यावेळी ते म्हणाले,रस्ते सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.वाहनधारकांच्या छोट्याशा चुकांमुळे रस्त्यांवर अपघात घडतात.त्यामुळे होणाऱ्या मृत्युंमुळे अनेक कुटुंबांचा आधार हिरावला जातो.त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वाहतूक नियमांचे पालन करून आपला स्वतःचा व इतरांच्या जीवाचे रक्षण केले पाहिजे असे आवाहन करून अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रस्ता सुरक्षा अभियान “सडक सुरक्षा व जीवन रक्षा” हे ब्रीद घेवून सुरू केल्याबद्दल देशमुख यांनी शासनाचे अभिनंदन केले.
यावेळी रस्ते सुरक्षा अभियानास सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे सुञसंचालन सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक गोविंद पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक हेमंत जयकर यांनी मानले. तसेच यावेळी उपस्थितांना रस्ता सुरक्षेसाठी वाहतूक नियम पालनाची शपथ देण्यात आली.वाहतूक नियमांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे व पत्रकाचे विमोचनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपप्रादेशिक परीवहन कार्यालय, अंबाजोगाई येथील कर्मचारी गणेश एडके, राहुल बळवंत, स्वाती भालेराव, अर्चना नरारे, दिलीप कांबळे, पत्रकार रणजित डांगे, पत्रकार नागेश औताडे, पत्रकार सतिष मोरे, पत्रकार नंदकुमार पांचाळ, वाहन चालक, विमा प्रतिनिधी, वाहन मालक आदींसहीत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.