बीड अव्वल ; पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान
डोंगरचा राजा | Updated
बीड: शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेण्यात देशभरात सर्वात चांगली कामगिरी करून बीडच्या प्रशासनाने चौमुलखी डंका वाजविला आहे. बीडच्या प्रशासनाची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून उद्या म्हणजे शनिवारी दिल्लीत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह आणि जिल्हा कृषी अधीक्षक एम.एल.चपळे यांचा सन्मान स्वत: मोदी करणार आहेत. या स्पर्धेत देशातील तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये बीड, नांदेड आणि तमिळनाडू येथील शिवगंगा जिल्ह्यांचा समावेश होता. मात्र, २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये सर्वाधिक विमा बीड जिल्ह्याने भरला होता आणि त्याचा लाभही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला होता. २०१६ -१७ या वर्षी खरीपात जिल्ह्यातून ५५ कोटी ४६ लाख विमा रक्कम भरण्यात आली होती त्याबदल्यात तब्बल २३३ कोटी ८४ लाख रुपये असा भरघोस निधी जिल्ह्याच्या पदरात पडला होता. तर २०१७ -१८ च्या खरीप हंगामात ६३ कोटी ७१ लाख तर रबी हंगामात ८ कोटी ४४ लाख रकमेचा विमा भरण्यात आला होता. या कामगिरीमुळे जिल्ह्याचा गौरव केला जाणार आहे. केंद्र सराकरच्या महत्वकांक्षी योजनेमध्ये बीड जिल्ह्याने केलेली कामगिरी उत्कृष्ट आहे. २०१६ – १७ मध्ये पिक विमा ररक्कम भरून घेण्यासाठी कृषी सहाय्यकापासून, क्षेत्रीय कर्मचारी, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ते जिल्हा कृषी अधिक्षकापर्यंतच्या अधिकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिक विम्याचे महत्व, बँकेत येणारे अडथळे, विमा रक्कम भरून घेण्यासाठी रात्र-रात्र बँक खुली ठेवणे तसेच विमा भरण्यासाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना अल्प उपहार याची सोय करण्यात आली होती. पुरस्कारासाठी या सर्व बाबी महत्वाच्या ठरल्या असून यामुळे जिल्ह्याची मान देशात ऊंचावणार आहे. उद्या दिल्ली येथील विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी एम.डी. सिंह आणि जिल्हा कृषी अधिक्षक एम.एल.चपळे हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे योगदान
पिक विमा भरण्याच्या मुदतीपासून अखेरपर्यंत ही मोहिम जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अधिकचा विमा भरून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. त्यांच्या आदेशानुसारच या काळात रविवारीही बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. महसूल कर्मचाऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकाºयांना दिलेल्या सुचनांचे पालन झाल्यानेच ही मोहिम जिल्ह्यात यशस्वी झाली होती.