Home » माझा बीड जिल्हा » शौचालयाचा निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार केला परत

शौचालयाचा निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार केला परत

 शौचालयाचा निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार केला परत

– आता राष्ट्रपती पुरस्कारही बोगस– अँड.देशमुख

बीड / डोंगरचा राजा

बीड जिल्ह्यात बोगसगिरीने कळस केला आहे. नाक कापलं तरी भोक कायम अशी अवस्था काही लोकांनी केली आहे. आष्टी तालुक्यातील शिदेवाडी गावाला सन २०११ मध्ये निर्मल ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र याचा थांगपत्ता गावातील नागरिकांनाच नव्हता. आता लोक शौचालय मागायला जातात तर त्यांना प्रशासन तुम्हाला योजना देता येत नाही म्हणून सांगते. याला वैतागून गावकऱ्यांनी चक्क बोगस पुरस्कार राष्ट्रपतींना परत पाठविला आहे. ही बाब लाजिरवाणी असून प्रशासनाने गावकऱ्यांना शौचालयाचा लाभ मिळवून द्यावा, अन्यथा आम्हाला गावकऱ्यांसोबत आंदोलनात उतरावे लागेल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.
घरे, शाळा, अंगणवाडी इत्यादी ठिकाणी स्वच्छता रहावी म्हणून केंद्र सरकारने निर्मल ग्राम योजना राबविली. या माध्यमातून हागणदारी मुक्त गाव उभे करून गावात प्रत्येक घर, शाळा आणि अंगणवाडी मध्ये शौचालय बांधण्याची योजना आहे. जिल्हात आष्टी तालुक्यातील कासारी ग्राम पंचायत अंतर्गत शिदेवाडी गावात ही योजना राबविली गेल्याचे खोटे रेकॉर्ड तयार करून या योजनेतील स्पर्धेत भाग घेतला गेला. गावकऱ्यांना थांगपत्ता लागू न देता चक्क राष्ट्रपती कार्यालयाची दिशाभूल करून हा पुरस्कार मिळविला गेला. यात काही महाभागांसह प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांचे खोटे अहवाल आहेत. त्यामुळे संगनमताने हे बोगस काम घडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबतची तक्रार शिदेवाडीत शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, तहसीलदार, आष्टी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी यांना दिली. मात्र त्यांनी यावर काहीच कारवाई केली नाही. म्हणून गावकऱ्यांनी जन आंदोलनाला निवेदन देऊन पाठपुरावा करण्याची आणि पुरस्कार परत पाठविण्याची मागणी केली.
त्यानुसार जन आंदोलनाने विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन याबाबत मागणी तर केली मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा पुरस्कार थेट राष्ट्रपतींना परत केला. हा पुरस्कार बोगस असल्याचे राष्ट्रपतींना कळवून यात समावेश असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींनी या गंभीर प्रकारची आणि थेट राष्ट्रपतींना फसवणाऱ्यांची गंभीर दखल घ्यावी. राष्टपतींची फसवणूक केवळ बनवाबनवी आणि खोटी कागदपत्र बनवून केली. असे प्रकार प्रशासनाने त्याच वेळेस रोखायला हवे होते. पण प्रशासनाने केलेले संगनमत देशासाठी धोकादायक असल्याचे जन आंदोलनाने राष्ट्रपती यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे.
आसपासच्या गावात शौचालय बांधले जात आहेत, आम्हालाही ही योजना द्या. अशी मागणी केली असता दिली जात नाहीत. ही खंत शिदेवाडीच्या जनतेला आहे. त्यांची झालेली फसवणूक तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या काळातील आहे.
राज्यात शौचालय बांधणीवर सरकार करोडो रुपये खर्च करीत आहे. मात्र काही अधिकारी लोक प्रतिनिधीला हाताशी धरून शौचालयही खाऊन टाकत आहेत. सातशे लोकसंख्येच गाव असलेल्या आणि एकही शौचालय नसलेल्या शिदेवाडीकरांना आता तात्काळ शौचालय द्यावे. त्यांची बोगस पुरस्कारातून सुटका करावी. अन्यथा याबाबत गंभीर आंदोलन उभे केले जाईल, असे अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.