जगात प्रत्येक जिवाची धडपड सुखासाठीच :- रामदासी
*माणूस सुखाच्या शोधात असतो, संत सुखाच्या अनुभूतीत* *जगतात….! ह.भ.प.भरतबुवा रामदासी.*
वडवणी / डोंगरचा राजा आँनलाईन
या जगात प्रत्येक जीवाची धडपड ही सुखासाठीच आहे. मनुष्य प्रत्येक कर्म करतो ते सुखासाठीच करतो तरीही त्याला खरं सुख मिळतच नाही, याचे कारण काय.? सज्जनहो.!नाशिवंत विषय भोगाच्या मागे लागल्यानंतर अविनाशी सुख कसे मिळेल.? आत्यंतिक दुःख निवृती आणि परमानंद सुखाच्या प्राप्तीसाठी संतविचारांचा नंदादीप सतत तेवत ठेवा. संतांनी अविनाशी सुखाचा मार्ग सांगितला. विश्व वंदनीय तुकाराम महाराज म्हणाले, *आपुला तो एक देव करूनी* *घ्यावा.. तेणेविण जीवा सुख नोहे* देव आपलासा करा.
मंडळी, देव आपलासा करणे याचा अर्थ देवाला आवडेल असे वागणे, असे विचार राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी यांनी आपल्या कीर्तनातून व्यक्त केले ते वडवणी तालुक्यातील चिंचाळा या गावी अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात बोलत होते.
पुढे बोलतांना ह.भ.प.भरतबुवा म्हणाले की, वर्तमान काळात मनुष्याचे प्रत्येक कर्म स्वार्थपरायण झाले आहे. धन, दारा आणि पुत्र एवढाच सिमीत विचार माणूस करीत आहे. संतांनी *हे विश्वची माझे घर* हा विचार मांडला. देवळात तर देव बघाच त्यासाठी तर वैदिक धर्मात देवळाची संकल्पना आली पण जिवंत माणसात देवत्व पहावयाला शिका.
*अमृतस्य पुत्रा:* असे वैदिक धर्माने सांगितले. संतांनी हाच उपदेश केला. कीर्तन भक्तीने सामाजिक मूल्य रूजवली म्हणून संत विचारांचा नंदादीप तेवत ठेवा, असे प्रतिपादन भरतबुवांनी केले. त्यांनी कीर्तनासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा *सदा नाम घोष करू हरिकथा* हा अभंग घेतला होता. ह.भ.प. शंकर महाराज कोळपे, नारायण महाराज वाळेकर, ह.भ.प. संतोष महाराज बीडकर आदी गायनाचार्य महाराज मंडळीची उत्तम साथसंगत होती. वे.शा.सं. योगेश महाराज जोशी यांनी पुष्पहाराने महाराजांचे स्वागत केले. कीर्तनासाठी पंचक्रोशितील व गावातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प. राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी (बीड,महाराष्ट्र)
संपर्क – 9421344960.