Home » माझा बीड जिल्हा » मैंदा शिवारात स्त्री जातीचे जिवंत अर्भक.

मैंदा शिवारात स्त्री जातीचे जिवंत अर्भक.

मैंदा शिवारात स्त्री जातीचे जिवंत अर्भक.

बीड / डोंगरचा राजा आँनलाईन

स्त्रीभ्रूण हत्येने काळवंडलेल्या बीड जिल्ह्यात अद्यापही मुलींना नकोशीचा दर्जा दिला जात असल्याच्या घटना उघड होत असून आज सकाळी मैंदा शिवारातील लक्ष्मीनगर वस्तीलगत एका शेतात स्त्री जातीचे अर्भक आढळलं असून या अर्भकाच्या हाताचे बोट श्‍वापदाने खाल्ल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असल्याने अनेकांचे मन हेलावून टाकले. सदरील अर्भकास ग्रामस्थांनी तत्परतेने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. नवजात मुलीच्या गळ्याला तिच्याच नाळाचे आडे दिसून आल्याने तिला मारण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा प्रथमदर्शी करत होते.

सर्वसामान्यांना सुन्न करून सोडणार्‍या घटनेची अधिक माहिती अशी की, एकीकडे सरकार बेटी बचाओचा नारा देत असताना दुसरीकडे मात्र स्त्रीभ्रूणहत्येने काळवंडलेल्या बीड जिल्ह्यात अद्यापही मुलीला नकोशी म्हणूनच वागवलं जातय. बीडपासून काही अंतरावर असलेल्या मैंदा शिवारात आज सकाळी स्त्री जातीचे जिवंत अर्भक मिळून आलं. लक्ष्मीनगर वस्ती येथील लालासाहेब घुमरे यांच्या शेतामध्ये पळाट्याच्या फासात पहाटेच्या दरम्यान लहान मुल रडण्याचा आवाज आल्याने घुमरे यांनी या घटनेची माहिती गावकर्‍यांना दिली. गावातील उत्रेश्‍वर घुमरे, बाबासाहेब घोरड, सीताराम उंबरे, ग्रामसेवक बाबासाहेब घुमरे, भैय्या घुमरे, चंद्रकांत घुमरे, बाळासाहेब घुमरे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी जिवंत अवस्थेतील स्त्री जातीचे अर्भक त्याठिकाणी दिसून आले. त्या अर्भकाच्या एका हाताचे बोट श्‍वापदाने खाल्ल्याची शंका उपस्थितांनी घेतली. एवढेच नव्हे तर ज्या निर्दयी मातेने हे स्त्री जातीचे अर्भक फेकून दिले तिनेच बहुदा त्या अर्भकाची नाळ तिच्या गळ्याभोवती आवळल्याचे उपस्थितांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी अर्भकास दाखल केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात हे तात्काळ रुग्णालयात आले, त्यांनी अर्भकावर उपचार सुरू केला असून सध्या अर्भकाची प्रकृती व्यवस्थीत असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक काळे हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.