*उर्ध्व कुंडलिकाचे पाणी शेतकर्यांना सोडण्यासाठी शिवसेनेचा चिंचवण रास्ता रोको*
भयंकर उन्हाळ्यामुळे सोनाखोट्टा, चिंचवण, दहिफळ, कोठरबन आदी गावातील येथील नागरीकांचा, जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असून यामुळे उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील पाणी कुंडलिका नदी पात्रात सोडण्यात यावे या मागणीसाठी आज दि. 12 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 वा. शिवसेनेच्यावतीने चिंचवण येथील शिवाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला. या प्रसंगी पाणी न सोडल्यास धरणाचे दरवाजे उघडू असा इशारा शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी प्रशासनाला दिला आहे.यंदाचा उन्हाळा अतिशय तिव्र भासत असून वडवणी तालुक्यातील सोनाखोट्टा, चिंचवण, दहिफळ, कोठरबन यासह इतर आसपासच्या वाड्या, वस्त्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच धरण उशाला असून कोरड मात्र घशाला पडत आहे. शेतकर्यांच्या शेतातील फळबागांना, पिकांना, जनावरांना प्यायला पाणी नाही त्यामुळे निवेदन देवून देखील संबंधीत प्रशासन कसल्याही प्रकारची दखल घेत नसल्या कारणाने शिवसेनेने आक्रमक पवित्र घेत शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवण येथील शिवाजी चौकात रास्ता रोको केला. या प्रसंगी बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक म्हणाले की, धरणाचे पाणी तात्काळ कुंडलिका नदी पात्रात सोडले नाही तर शिवसेना धरणाचे दरवाजे स्वत: उघडेल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय महाद्वार, तालुकाप्रमुख विनायक मुळे, प्रताप म्हात्रे, बंडूमामा जाधव, रामदास ढगे, नरेंद्र राठोड, युवराज शिंदे, सर्जेराव जोगदंड, महेश जाधव, बालासाहेब लोकरे, बाबासाहेब चाटे, बाबासाहेब म्हात्रे, बाबु कोठुळे, विक्रम बडे, शेख समीर, शेख दादा पटेल, शेख मतीन, बाबा कोठुळे, गोवर्धन कोठुळे, लक्ष्मण डोंगरे यांच्यासह शिवसेना महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिकांसह असंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.यावेळी प्रशासनाकडून पीएसआय जे.ई. कागदे, नायब तहसिलदार खिल्लारे यांनी निवेदन स्विकारले.