Home » माझा बीड जिल्हा » भ्रष्टाचार निर्मूलन समितीची जम्बो बैठक

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची जम्बो बैठक

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची जम्बो बैठक

– तक्रारदारांनो तक्रारी घेऊन या
– अँड.देशमुख

बीड / आँनलाईन डोंगरचा राजा

 

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व खात्यांच्या जवळपास सत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रतिनिधी न पाठवता स्वतः या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या बैठकीत जास्तीत जास्त तक्रारदारांनी आपल्या रास्त तक्रारींसह उपस्थित राहून आपल्या तक्रारी दाखल करून त्या सोडवून घ्याव्यात, असे आवाहन या समितीचे अशासकीय सदस्य अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
जेष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे यांच्या मागणीवरून सरकारने सन १९९६ साली विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची स्थापना केली आहे. सरकारने भ्रष्टाचार या शब्दाची व्याख्या ‘ सरकारी कामातील विलंब, अनियमितता, गैर व्यवहार आणि भ्रष्टाचार ‘ अशी केली आहे. यावरून या समितीची कार्यकक्षा आणि समितीच्या कामाची व्याप्ती लक्षात येते. जनतेच्या प्रशासनाच्या विरोधातील रास्त तक्रारी व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून सोडविणे आणि तक्रारदारांना न्याय देणे हा या समितीचा उद्देश आहे.
वेगवेगळ्या योजनेची कामे चांगली झालेली नाहीत, कामाचे पैसे उचलले मात्र काम केले नाही, निकृष्ट दर्जाचे काम झाले, या आणि अशा कित्तेक कारणांमुळे जनतेच्या तक्रारी असतात. सामान्य जनता गावातील अशा चार चौघांच्या आणि त्यांच्या पाठिराख्यांच्या घोटाळ्यांना वैतागून तक्रार करीत असते. यांचे मनसुबे कुठे तरी उधळून लावले पाहिजेत. एवढेच नाही तर अशा लोकांच्या बेकायदा वागण्याला कुठे तरी लगाम घातला पाहिजे. सामान्य नागरिकच याला लगाम घालू शकतो.
शासन नियमाप्रमाणे होणारी कामे कधी कधी जाणीवपूर्वक केली जात नाहीत. अशा रास्त कामांची तक्रार जनता संबंधित अधिकाऱ्यांकडे करीत असते. अशा तक्रारीही या बैठकीत मांडता येतील. थोडक्यात भ्रष्टाचाराच्या सर्व तक्रारी या समिती समोर चर्चेस घेतल्या जातात.
तक्रारदारांनी तक्रार लिहिताना सविस्तर लिहावी. तक्रार लिहिताना प्रति, मा. अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, तथा जिल्हाधिकारी, बीड यांच्या नावे द्यावी. त्यात विषय थोडक्यात परंतु ज्या विषयाची तक्रार असेल तो विषय समजेल असा स्पष्ट लिहावा. त्यानंतर तक्रारदारांची नावे, पूर्ण पत्ता आणि शक्यतो सुलभ संपर्कासाठी तक्रारदाराचा मोबाईल नंबर लिहावा. जर काही कागद संदर्भासाठी जोडायची असतील, तर त्याचा संदर्भ द्यावा. यानंतर तक्रार कशाशी संबंधित आहे, तो भाग पहिल्या परिच्छेदात लिहून त्यानंतर नेमकी कशामुळे तक्रार केली आहे. अडचन काय आहे. अडथळा कोण आणतोय. वगैरे सर्व कथन करावे. शेवटी विनंती मध्ये आपले कामाबाबत नेमके म्हणणे थोडक्यात लिहावे. तक्रारींसोबत यापूर्वी तक्रारी केल्या असतील तर त्याचा प्रति जोडव्यात. त्यासंदर्भात काही पत्र व्यवहार झाला असेल तर त्यातील महत्वाचे कागडपत्रही जोडावेत.
तक्रारी या शक्यतो द्वेष भावनेने नसतात. गावातील बोगस काम, सनदशीर मार्गांची कामे होण्यात येणारे अडथळे, जाणीवपूर्वक केली जाणारी पिळवणूक यामुळे तक्रारी होतात. अपूर्ण राहिलेल्या विकास योजना अनेकदा अशा तक्रारींमुळे मार्गी लागतात. यातून खरा विकास साध्य होतो. म्हणून या बैठकीत जास्तीत जास्त तक्रारदारांनी आपल्या तक्रारी नोंदवून त्या सोडवून घ्याव्यात. बोगस कामांच्या तक्रारी करणे चुकीचे नसून गद्दारांना धडा शिकविण्यासाठी ते देशप्रेमाचे लक्षण आहे, असे अशासकीय सदस्य अँड. अजित देशमुख यांनी म्हंटले आहे.

———–
चौकट
—————
– जिल्हाधिकारी सिंह यांचे अभिनंदन
– अँड. अजित देशमुख

सर्व अधिकाऱ्यांना पाचारण करून चांगली बैठक घेऊन भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा निपटारा करण्याचा जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांचा हा उत्तम प्रयत्न आहे. आता जनतेने चांगला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. अशी बैठक बोलावून जनहित साध्य होईल असे वाटत असल्याने जन आंदोलनाने जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published.