Home » माझा बीड जिल्हा » बुध्दांचे तत्वज्ञान स्विकारले तरच जगाचा उध्दार

बुध्दांचे तत्वज्ञान स्विकारले तरच जगाचा उध्दार

बुध्दांचे तत्वज्ञान स्विकारले तरच जगाचा उध्दार
धम्मदेसना व्याख्यान मालेत भिक्खु धम्मशील यांचे प्रतिपादन
बीड,दि.6(प्रतिनिधी)ः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्‍वातला सर्वात महान असलेला विज्ञानवादी बौध्द धम्म आपल्याला दिला आहे. समाजातल्या  प्रत्येक व्यक्तीने धम्माचे मनन, चिंतन करावे, खोटे बोलणे टाळले पाहिजे.  बुध्दांचे महान तत्वज्ञान स्विकारल्याशिवाय या जगाचा उध्दार कधीही साध्य होणार नाही. असे परिवर्तनवादाचे विचार भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे शिष्य तथा ऑल इंडिया भिक्खु संघाचे सदस्य धम्मशील (हिंगोली) यांनी धम्मदेसना व्याख्यान मालेत व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतिनिमित्त गुरूवार (दि.5) रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित केलेल्या धम्मदेसना व्याख्यान मालेत ते बोलत होते.
उपस्थित जनसमुदायाला धम्मदेसना देताना भदंत धम्मशील म्हणाले की, बुध्द हा साधासूधा मानवपुत्र असून तो शेवटपर्यंत साधा मनुष्य राहिला. बुध्दांनी सर्वांना आपल्या धम्माचे दरवाजे खुले केले, हे जगमान आहे. बुध्द जन्मत अलौकिक होते. परंतु तरीही त्यांनी कधीच अलौकिक असल्याचा आव आणला नाही. अलौकिक चमत्कार आपल्या अंगी असल्याचे भासवुन जनतेला फसविले नाही. बौध्द धम्म हा विशाल महासागरासारखा आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. तथागत गौतम बुध्दांने करूणेचा प्रचार करून त्या काळातील लोकांची मने आकर्षीत केली, व त्यांना योग्य मार्ग दाखवून लोकांच्या मनामध्ये मैत्र विकसीत केली. बौध्द धम्म हा वास्तववादी आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टींवर बुध्दांचा विश्‍वास नव्हता. बुध्दांने जगाला एक अत्यंत महान अशी गोष्ट सांगीतलेली आहे. मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होवू शकणार नाही, असे बुध्दांचे सांगणे आहे.  बुध्दांची विचारसरणी ही लोकशाहीची विचारसरणी आहे. बौध्द धम्माचा वृक्ष भारतात अद्यापही जिवंत आहे. फक्त त्याचा पाला सुकलेला आहे. या वृक्षाला खतपाणी घातले तर त्याला पालवी फुटेल. बौध्द धम्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला असून हा धम्म मानवतावादी धम्म आहे. या धम्माशिवाय मानवाच्या कल्याणाचा दुसरा कोणताही धम्म नाही. असे उद्गार भदंत धम्मशील यांनी उपस्थित जणसमुदायाला धम्मदेसना देतावेळी काढले.या धम्मदेसना कार्यक्रमाचे प्रास्थाविक समिती प्रमुख संतोष जाधव यांनी तर सुत्रसंचालन माया दिवाण यांनी केले. आभार प्रा.डॉ.उत्तम साळवे यांनी व्यक्त केले. यावेळी आंबेडकरी जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्विरित्या पार पाड्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
चौकट
शनिवारी दिपक कदम यांचे याख्यान
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या जयभीम महोत्सवात अभ्यासक दिपक कदम यांचे बहूजन समाजासाठी शैक्षणिक स्थिती आणि आजची आव्हाने या विषयावर व्याख्यान शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सायं. 6.30 वाजता आयोजित केले आहे. या व्याख्यानाला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published.