Home » महाराष्ट्र माझा » *आठ शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न, तिघांचा मृत्यु* 

*आठ शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न, तिघांचा मृत्यु* 

*आठ शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न, तिघांचा मृत्यु*
डोंगरचा राजा ऑनलाईन  । परभणी
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोंड अळीच्या संकटाने संपूर्ण उध्वस्त केले आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या मानवत तालुक्यातील मानोली या गावात एका पाठोपाठ एक अशा आठ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा या घटनेने हादरला आहे.
मानवत शहरापासून अवघ्या ६ कि.मी. अंतरावर असलेल्या मानोली या गावात ९० टक्के क्षेत्रावर कपाशीची लावगड केली जाते. परंतु यंदा ७० टक्के कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून आला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी एका पाठोपाठ एक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात या गावातील निवृत्ती मोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वचिष्ठ शिंदे, अमोल सुरवसे यांनी विष प्राशन करुन आपली जीवनायात्रा संपवली. तसेच शेख शार्गीद, भागवत मांडे, राहुल शिंदे, महादेव तळेकर, भारत केशवराव सुरवसे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
दोघांची प्रकृती चिंताजनक
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना उपचारासाठी परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मानोली या गावातील या घटनेची गंभीर दाखल प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
कर्जमाफीचा गोंधळ
राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा गरजू शेतकऱ्यांना फायदा मिळाला नसल्याचे दिसत आहे. मानोली गावातल्या केवळ १० टक्के लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. पीकविम्याची मदत अद्यापही मिळाली नाही. संपूर्ण गावात नैराश्याचे वातावरण पसरले आहे. अशातच बिटी बियाणे कंपन्यावर शासनाने कोणतीही कारवाई न केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
शेतकऱ्यांचे समुपदेशन सुरू
मानवत तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मानोली या गावात तळ ठोकून असून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, याबाबत समुपदेशन करण्यावर भर देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.