*तागडगावंच्या सप्ताहात मुस्लिमांचा सद्भाव*
भक्तांची तहान भागविण्यासाठी सरसावले रायमोहकर‘भाई
बीड/ डोंगरचा राजा
संत श्रेष्ठ, श्रीमंतयोगी श्री संत भगवानबाबा
यांच्या 85 व्या वार्षिक नारळी सप्ताहात सर्व धर्म समभावाचे दर्शन होत
आहे. तागडगाव ता.शिरुर कासार येथे सुरू असलेल्या या सप्ताहात
मुस्लिम-दलित समाजाने काम करण्याच्या जबाबदार्या घेतलेल्या आहेत. संत
भगवानबाबा यांनी दिलेल्या सर्वधर्म समभावाच्या संदेशाची येथे कृती
होतांना दिसत असून भगवानगडाचे महंत न्यायाचार्य ह.भ.प.नामदेव शास्त्री
महाराज यांच्या प्रेरणेतून हा सप्ताह संपन्न होत असून रायमोहच्या मुस्लीम
बांधवांनी भगवानबाबांच्या भक्तांची तहान भागविण्यासाठी शुध्द फिल्टरचे
पाणी देवून आपला सद्भाव दाखवला आहे. विशेष म्हणजे तागडगावचे मुस्लिम
बांधव सप्ताहातील पार्कीगची व्यवस्था सांभाळत आहेत.
राज्यात सर्वत्र चर्चेत असलेल्या संतश्रेष्ठ भगवानबाबा यांनी सुरू केलेला
85 वा वार्षिक नारळी सप्ताह यंदा तागडगाव ता.शिरुर कासार येथे सुरू आहे.
या सप्ताहासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येत आहेत. या
सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक कार्यक्रमाची दररोज रेलचेल
आहे. राज्यातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन या ठिकाणी होत असून प्रसिध्द
रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांची रामकथा येथे सुरू आहे. या ऐतिहासिक
सप्ताहामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे.
रायमोह येथील मुस्लिम बांधवांनी सप्ताहासाठी राज्यभरातून आलेल्या
भगवाबाबाच्या भक्तांची तहान भागविण्यासाठी शुध्द फिल्टरचे पाणी देण्याची
जबाबदारी स्विकारली आहे. विशेष म्हणजे संत भगवानबाबा यांनी सर्वधर्म
समभाव या मुल्ल्याची रुजवणूक केलेली आहे. याची कृती तागडगाव येथील नारळी
सप्ताहामध्ये पाहवयाला मिळत आहे. या सप्ताहात मुस्लिम बांधवांनी आपला
सद्भाव दाखविल्यामुळे याची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. तर दलित
समाजानेही या सप्ताहात उत्साहाने सहभाग नोंदविलेला आहे. सर्व जाती
धर्माच्या भाविक भक्तांनी या सप्ताहात पडेल ते काम स्विकारले असून हा
सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू आहे.
* हनुमंत महाराज यांचे अमृततुल्य कीर्तन
सप्ताहामध्ये दि.30 मार्च रोजी ह.भ.प.हनुमंत महाराज शास्त्री यांचे
अमृततुल्य कीर्तन रात्री 9 ते 10 या दरम्यान संपन्न झाले. संतश्रेष्ठ
भगवानबाबा यांच्या जीवनपटावर त्यांनी आपले कीर्तन केले. भगवानबाबा यांनी
केलेल्या असामान्य कार्यावर त्यांनी आपल्या वाणीतून भाविक भक्तांना
मंत्रमुग्ध केले. या कीर्तनाला जिल्हाभरातील लाखो भाविक भक्त उपस्थित
होते.