झीनत अमानला फसविणा-या मर्सिडीज जप्त.
डोंगरचा राजा ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांची फसवणूक व त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सरफराज उर्फ अमन खन्नाच्या घरून पोलिसांनी दोन मर्सिडीज गाड्या व एक होन्डा अॅकॉर्ड गाडी जप्त केली आहे. सरफराजच्या घरातून तब्बल पंचवीस लाख किमतीचे सोन्याचे दागिने व त्याच्या अन्य संपत्तीचे कागदपत्रही जप्त करण्यात आले आहेत. सरफराजने या सर्व गाड्या व दागिने अमान यांची फसवणूक करून लुटलेल्या पैशातून विकत घेतल्याचा संशय पोलिसांना असल्याने पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.

सरफराजने झीनत अमान यांना तब्बल १५. ४ कोटी रुपयांना फसवले आहे. २०११ साली एका कार्यक्रमादरम्यान सरफराजची व झीनत अमान यांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले त्यानंतर झीनत अमान यांची बरीचशी कामे सरफराज करायचा. या कामांसाठी वेगवेगळ्या कारणाने तसेच कधी स्वत:च्या व्यवसायासाठी सरफराजने त्यांच्याकडून पैसे लाटले. २०११ ते २०१५ च्या दरम्यान त्याने त्यांच्याकडून १५.४ कोटी रुपये घेतले. मात्र रक्कम तो परत करत नव्हता. तसेच त्याने झीनत यांच्या मुलांच्या नावाने घेतलेल्या घरांचे कागदपत्र देखील खोटे असल्याचे समोर आले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ३० जानेवारी रोजी सरफराज विरोधात फसवणूकीचा गुन्हा जुहू पोलिसांत दाखल केला होता. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी २२ मार्चला झीनत अमान यांनी सरफराजवर बलात्कार केल्याचा देखील आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी सरफराजला अटक केली होती. बुधवारी सरफराजला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

सरफराज व झीनत अमान पती पत्नी?
सरफराज आणि झीनत अमान यांचे लग्न झाले आहे का याचा देखील पोलीस तपास करत आहेत. झीनत अमान यांनी बलात्काराची तक्रार दाखल करत असताना पोलिसांकडे त्यांचा व सरफराजचा निकाहनामा देखील सादर केला आहे. २०१६ साली या दोघांनी निकाह केल्याचे या निकाहनाम्यात नमूद करण्यात आलेले आहे. मात्र या निकाहनाम्यात साक्षीदार म्हणून नोंद असलेल्या काझीची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी मात्र हा निकाह झाल्या नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.