Home » Uncategorized » अनधिकृत चौक आणि पाट्यांमुळे अंबाजोगाईची शांतता धोक्यात..

अनधिकृत चौक आणि पाट्यांमुळे अंबाजोगाईची शांतता धोक्यात..

अनधिकृत चौक आणि पाट्यांमुळे अंबाजोगाईची शांतता धोक्यात..
अंबाजोगाई : देशभरात कितीही मोठ्या दंगली झाल्या तरी त्याकाळात कोणत्याही बंदोबस्ताशिवाय शांतता बाळगणारे शहर म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. मात्र, शहराच्या या प्रतिमेला तडा जातो कि काय अशी शंका येण्यासारख्या अप्रिय घटना मागील काही कालावधीत घडल्या आहेत. याला कारणीभूत ठरत आहेत शहरात बोकाळलेले अनधिकृत चौक आणि त्यांच्या पाट्या ! या अनधिकृत चौकांच्या पाट्यामुळे शहराची शांतता तर भंग होताच आहे, सोबतच वाहतुकीसही अडथळा होत आहे.
मराठवाडयाचं पुणं म्हणून अंबाजोगाईला ओळखले जाते. प्राचीन काळापासून शैक्षणिक पंढरी असलेल्या अंबाजोगाईने सर्वच क्षेत्रात आपले वेगळेपण जोपासले आहे. साहित्य, संगीत, कला व राजकारण या सर्वच क्षेत्रांनी शहराची वेगळी संस्कृती निर्माण केली व पुढची पिढीही त्याच संस्कृतीचे अनुकरण करून ही परंपरा जोपासत आहे. अंबाजोगाई शहरात जुन्या काळात शिवाजी चौक, सावरकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, हे जुने चौक होते. त्यानंतर शहराच्या विस्तारीकरणाबरोबरच यशवंतराव चव्हाण चौक, भगवानबाबा चौक, तथागत चौक, छत्रपती चौक, मीनाताई ठाकरे चौक, बाजीप्रभू चौक, अशा अनेक चौकांची निर्मिती झाली. मात्र, सार्वजनिक ठिकाणी असणाºया कोणत्या चौकात कसलाही पुतळा नाही. ही परंपरा जपण्यात आली. मात्र, गेल्या दोन वर्षात मुख्य रस्त्यावर रस्ता फुटला की त्या ठिकाणी विविध नावांच्या पाट्या लावण्याचा सपाटा चालू झाला आहे. रस्त्यातच अशा पाट्या लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी लहानमोठ्या अपघातांची संख्याही वाढली आहे. शिवाय मुख्य रस्त्यातच अशा पाटया लावण्यामुळे शहराचे विद्रूपीकरणही होऊ लागले आहे.
दोन दिवसांपूर्वी शहरातील एका महापुरुषांच्या नावाच्या पाटीला कोणीतरी अज्ञात समाजकंटकाने धक्का दिल्याने तणाव निर्माण झाला होता. वेळीच पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला. अशा घटनांपासून शहर दूर राहते. याचा मोठा प्रत्यय १९९२ च्या दंगलीतही आला होता. देशात सर्व ठिकाणी दंगे सुरू असतांना अंबाजोगाई शहर मात्र शांत होते. तशी इतिहासात अंबाजोगाईच्या शांततेची व सहिष्णूतेची नोंदही आहे. मात्र, आता अशा किरकोळ प्रकारांमधून गावच्या शांततेला तडे जात असतील तर ती बाब अंबाजोगाईकरांसाठी चिंतनाचा विषय आहे. अंबाजोगाई शहरात अधिकृत चौक किती व कोणते? याची माहिती नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहिर करावी. रस्त्यात अडसर ठरणाºया अशा घटनांना व पाट्यांना पायबंद घालावा तरच शहराच्या संस्कृतीला लागणारे हे नवे ग्रहण दूर होईल व गावची शांतता अबाधित रहावी. यासाठी सामुहिक प्रयत्न करून अशा अपप्रकारांना पायबंद घालण्यासाठी पुन्हा पुढे आले पाहिजे. तरच अंबाजोगाईची निर्माण झालेली ओळख अबाधित राहिल.
==========================

Leave a Reply

Your email address will not be published.