लंडनमध्ये ‘आज्जी’चा गौरव!
एका मुलाच्या वासनेची शिकार ठरलेल्या नातीला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारी आजी
आँनलाई डोंगरचा राजा
मराठी- हिंदी कलाकृतींतून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या, तसेच रंगभूमीच्या माध्यमातून स्त्री हक्कांचा, महिला सक्षमीकरणाचा जागर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्य लेखिका सुषमा देशपांडे यांचा लंडन येथे नुकत्याच झालेल्या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला. रंगभूमी असो वा चंदेरी पडदा, आपली भूमिका अधिकाधिक जिवंत कशी होईल, यावर भर देणे हे सुषमा देशपांडे यांच्या अभिनयाचे सार सांगता येईल. ‘आज्जी’ या हिंदी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाबद्दल सुषमा देशपांडे यांना गौरविण्यात आले.
लंडन येथे शनिवारी झालेल्या ‘यूके आशियाई चित्रपट महोत्सवा’मध्ये सुषमा देशपांडे यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देवाशिष माखिजा यांनी दिग्दर्शित केलेला ‘आज्जी’ हा चित्रपट सारेगामा आणि यूडली फिल्म्स यांची संयुक्त निर्मिती आहे. खेळण्या-बागडण्याच्या अल्लड वयात वासनेची शिकार ठरलेली आपली नात मंदा अकाली कोमेजून जावू नये यासाठी तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला अद्दल घडवणाऱ्या, धडा शिकवणाऱ्या कठोर आजीची भूमिका सुषमा देशपांडे यांनी ‘आज्जी’ या चित्रपटात रंगवली आहे. स्थानिक राजकारण्याच्या मुलाच्या वासनेची शिकार ठरलेल्या आपल्या नातीला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारी आजी, राजकारणी आणि पोलीस यांची अभद्र युती, त्यातून सामान्यांवर होणारे परंतु तेवढ्याच ताकदीने दडपून टाकले जाणारे अत्याचार, पीडितेच्या पालकांची होणारी घुसमट, उद्ध्वस्त होत जाणारे कुटुंब आणि या परिस्थितीला शरण न जाता ‘त्या’ नराधमाला अखेरीस धडा शिकवणारी शस्त्रसज्ज झालेली आजी, अशी खुर्चीला खिळवून ठेवणारी ‘आज्जी’ या चित्रपटाच्या कथेची गुंफण आहे.