Home » Uncategorized » ज्येष्‍ठ साहित्यिक,डॉ. गंगाधर पानतावणे यांचे औरंगाबादेत निधन

ज्येष्‍ठ साहित्यिक,डॉ. गंगाधर पानतावणे यांचे औरंगाबादेत निधन

ज्येष्‍ठ साहित्यिक,डॉ. गंगाधर पानतावणे यांचे औरंगाबादेत निधन
संपादक, विचारवंत आणि अस्‍मितादर्श चळवळीचे जनक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे औरंगाबादेत निधन झाले. ८१ वर्षीय पानतावणे यांना गेल्या काही दिवसांपासून दीर्घ आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर शहरातील मणिक हॉस्‍पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज(दि.२७) पहाटे २ वा. सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. पानतावणे हे पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तसेच त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने २०१८ साली त्यांना पद्मश्री पुरस्‍काराने सन्‍मानित केले. नुकतेच २० मार्चला राष्‍ट्रपती भवनात या पुरस्‍कारांचे वितरण झाले. मात्र, प्रकृती अस्‍वास्‍थ्यामुळे डॉ. पानतावणे या सोहळ्यास उपस्‍थित राहू शकले नाहीत. त्यानंतर सातच दिवसांत त्यांची प्राणज्योत मालवली.
पानतावणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेतील एक हिरा निखळला. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी छावणी येथील स्‍मशानभूमित अंत्यसंस्‍कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई असा परिवार आहे.
अस्‍मितादर्श चळवळीचे जनक
डॉ. गंगाधर पानतावणे हे अस्‍मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी या चळवळीच्या माध्यमातून अनेक मान्यवर लेखक व कवी घडविले. त्यांनी दलित साहित्य चळवळीला मोठे योगदान दिले. त्यांचा दलित साहित्यावर सखोल अभ्यास होता. तसेच त्यांनी अस्‍मितादर्श या नियतकालिकाचे संपादक म्‍हणूनही काम केले. या नियतकालिकाने दलित साहित्य चळवळीला वैचारिक अधिष्‍ठान दिले.
पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुखपद भूषवितानाच त्यांनी साहित्य चळवळ जोपासली. मूल्यवेध, धम्‍मचर्चा, मूकनायक(डॉ. आंबेडकरांचे चरित्र), विद्रोहाचे पाणी पेटले, दलित प्रबोधन, प्रबोधनाची दिशा, वादळाचे वंशज, किल्‍ले पन्‍हाळा ते किल्‍ले विशाळगड, दलित वैचारिक वाड्गमय आदी ग्रंथ लिहले व संपादित केले.
डॉ. पानतावणे यांच्याविषयी..
गंगाधर विठोबाजी पानतावणे हे मूळचे विदर्भातील नागपूरचे. २८ जून १९३७ मध्ये त्यांचा जन्‍म झाला. डी. सी. मिशन स्‍कूल येथे प्राथमिक शिक्षण तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्‍कूल, नागपूर येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. १९५६ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून कला शाखेतून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर ते औरंगाबादला आले. मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातच त्यांनी मराठीचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्‍हणून काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published.