Home » Uncategorized » औरंगाबादकर दुर्गंधीने त्रस्त अन्‌ लोकप्रतिनिधी सहलीवर! 

औरंगाबादकर दुर्गंधीने त्रस्त अन्‌ लोकप्रतिनिधी सहलीवर! 

औरंगाबादकर दुर्गंधीने त्रस्त अन्‌ लोकप्रतिनिधी सहलीवर!

Aurangabad Politician Picnic

गेल्या 35 दिवसांपासून औरंगाबाद शहर कचऱ्याच्या प्रश्‍नावरून ढवळून निघाले आहे. पर्यायी जागा शोधताना, शोधली तर विरोधाला सामोरे जाताना महापालिकेची पुरती कोंडी झाली आहे. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्रास नको म्हणून नागरिक कचरा जाळू लागले आहेत. धुरामुळे प्रदूषण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याच प्रश्‍नावरून सत्ताधारी – विरोधकांत जुंपलेली असताना सहल पुढे आली आहे.

औरंगाबाद – राजकारणाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे शहरातील आमदार, खासदार व नगरसेवक सहकुटुंब तीनदिवसीय अमृतसरच्या दौऱ्यावर गेले आहेत. शहरात जागोजागी कचरा पसरलेला असताना, दुर्गंधीने नागरिक त्रस्त असताना हे सर्वजण शुक्रवारी (ता. 23) चिकलठाणा विमानतळावरून एक चार्टर आणि एक विशेष अशा दोन विमानांनी अमृतसरला रवाना झाले. दर तीन ते चार वर्षांनी सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येत टूर आयोजित करतात, अशी माहिती एका लोकप्रतिनिधीने दिली.

गेल्या 35 दिवसांपासून औरंगाबाद शहर कचऱ्याच्या प्रश्‍नावरून ढवळून निघाले आहे. पर्यायी जागा शोधताना, शोधली तर विरोधाला सामोरे जाताना महापालिकेची पुरती कोंडी झाली आहे. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्रास नको म्हणून नागरिक कचरा जाळू लागले आहेत. धुरामुळे प्रदूषण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याच प्रश्‍नावरून सत्ताधारी – विरोधकांत जुंपलेली असताना सहल पुढे आली आहे.

कचऱ्यासह अन्य वेळी, वेगवेगळ्या प्रश्‍नांवर एरव्ही एकमेकांवर आरोप करणारे हेच लोकप्रतिनिधी दर तीन ते चार वर्षांनी एकत्र येत सहकुटुंब तीन ते चार दिवस सहलीचे आयोजन करतात. यंदा अमृतसरची निवड झाली आहे.

या सहलीत जालन्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, आमदार सुभाष झांबड, नगरसेवक ऋषिकेश खैरे, नगरसेवक राजू शिंदे, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, अभिजित देशमुख यांच्यासह सर्व मिळून 334 जण गेले आहेत. त्यात काही उद्योजकांचाही समावेश आहे.

तीनदिवसीय दौऱ्यात हे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कुटुंबीय शुक्रवारीच “वाघा’ बॉर्डरवर गेले. शनिवारी (ता. 24) सर्वजण अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर अन्य एका ठिकाणाला भेट देऊन ही मंडळी रविवारी (ता. 25) सायंकाळी औरंगाबादेत दाखल होणार असल्याची माहिती संबंधित लोकप्रतिनिधीने दिली.

कुटुंबीयांसाठी वेळ
राजकारणात सातत्याने गुंतलेले असल्याने लोकप्रतिनिधींचे संसार आणि घरच्या मंडळींकडे दुर्लक्ष होते. घरच्या मंडळींना वेळ देण्यासाठी दर तीन ते चार वर्षांनी ही सगळी मंडळी आणि काही व्हीआयपी लोक सहलीचे नियोजन करीत असतात. आतापर्यंत दोन ते तीनवेळा अशाप्रकारे सहल झाली आहे. एकवेळा दुष्काळामुळे रद्दही केली होती. यात राजकारण बाजूला ठेवत सर्वजण एकजूट दाखवतात, हे या सहलीचे वैशिष्ट्य असल्याचेही संबंधित लोकप्रतिनिधीने सांगितले. शहरातील “एबीसी’ ग्रुपकडून दर दोन ते तीन वर्षांनी अशा सहलींचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले जाते. हा “एबीसी’ ग्रुप काय आहे, याबाबत सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वांनाच कुतूहल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.