Home » माझा बीड जिल्हा » *”कल्याणराव” ने दिड कोटी लिटरचे शेततळे *

*”कल्याणराव” ने दिड कोटी लिटरचे शेततळे *

*”कल्याणराव” ने दिड कोटी लिटरचे शेततळे *
सहायक संचालकांनी केला कल्याण कुलकर्णींचा सत्कार
बीड /डोंगरचा राजा
 डोंगरी माळरानावर थोडे थोडके नव्हे तर तब्बल दीड कोटी लिटरचे शेततळे बांधलेले प्रगतिशील शेतकरी कल्याण कुलकर्णी यांना कृषी विभागाच्या वतीने त्यांच्या शेतावर जाऊन सन्मानित करण्यात आले. शेततळे पाहण्यासाठी आलेल्या कृषीच्या सहायक संचालकांनी हा गौरव केला.
धारूर तालुक्यातील धुनकवड येथे प्रगतिशील शेतकरी कल्याण कुलकर्णी सातत्याने शेतीत विविध उपक्रम राबवत असतात. डोंगरी भागात शेती असतानाही या शेतीत विविध पिके घेणारे शेतकरी अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या शेतात राज्य सरकारच्या योजनेतून सामूहिक  शेततळे घेतले . विशेष म्हणजे या योजनेला मर्यादा असली तरी शेतीचा विकास करायचा म्हणून कुलकर्णी यांनी यात स्वखर्चाची भर घालत तब्बल एक एकर जागेत हे शेततळे उभारले आहे. धुनकवड सारख्या भागात उंच डोंगरावर हे दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही यांत्रिक मदतीशिवाय या डोंगराखालील ३५ एकर शेती सिंचनाखाली आली आहे. यात २५ एकरवर फळबाग असून यात डाळिंब , केशर आंबा , मोसंबी, सीताफळ, लिंबोणी आदी पिकांचा समावेश आहे.
कल्याण कुलकर्णी  कामगिरी पाहण्यासाठी औरंगाबाद विभागाचे सहायक संचालक प्रतापसिंह कदम यांनी नुकतीच या शेततळ्याला भेट दिली. या कामाबद्दल कल्याण कुलकर्णी यांचे कौतुक करत कृषी विभागाला अशाच प्रकारे काम करणाऱ्या शेतकऱ्यांची गरज असल्याचे सांगितले. कदम यांनी यावेळी कल्याण कुलकर्णींचा कृषी विभागाच्या वतीने गौरव केला. यावेळी तांत्रिक अधिकारी गायकवाड, चिंतलवाड , मंडळ कृषी अधिकारी पवार यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी आणि परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.