*सागरी सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षकांचे थकित मानधन अदा करणार :- ना.जानकर*
आँनलाईन /डोंगरचा राजा
मुंबई, दि. 22 : पालघर, ठाणे,मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यांसाठी एकुण 273 सुरक्षा रक्षक व 23 पर्यवेक्षक नेमण्यात आले असून त्यांना देय असलेल्या मानधनाची थकित रक्कम एप्रिल महिन्यात देण्यात येईल, असे आश्वासन मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले. राज्यातील सागरी सुरक्षेसाठी शासनाने अनेक आश्वासक पाऊले उचलली असून 27 नोव्हेंबर च्या हल्ल्यानंतर राज्यातील 525 लॅंडिंग पाईंट पैकी 91 पाईंट्स हे अति संवेदनशिल म्हणून घोषित केले असून येथे नौदल, कोस्ट गार्ड, पोलीस यांच्यासह मत्स्यविभागामार्फत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत अशी माहिती या निमीत्ताने विचारलेल्या एका उपप्रश्नाला उत्तर देताना मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी दिली. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नरेंद्र पाटील, अनिल परब, जयंत पाटील, विजय उर्फ भाई गिरकर, सुनिल तटकरे आदिंनी सहभाग घेतला होता.