Home » Uncategorized » *शरद पवार काँग्रेस आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार? *

*शरद पवार काँग्रेस आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार? *

*शरद पवार काँग्रेस आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार? *

मुंबई / आँनलाईन डोंगरचा राजा

आगामी काळात कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट थोपवून सत्ताग्रहण करण्याचा चंग काँग्रेसने बांधला असून मोदींना टक्कर देण्यासाठी पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचे नाव पुढे करण्याची खेळी काँग्रेसकडून केली जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने राजधानी दिल्लीत चाचपणी सुरु केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
केंद्रातील सध्याचे भारतीय जनता पक्षाचे सरकार मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजयी घोडदौड करते आहे. देशभरातील विविध विधानसभा निवडणुकांमधून २१ राज्यांची सत्ता भाजपने हस्तगत केलेली आहे. मोदी नावाची ही घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांपुढे फार मोठे आव्हान निर्माण झालेले असतानाच काँग्रेसने विरोधकांच्या आघाडीच्या माध्यमातून आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे. काँग्रेस एकेकाळी मजबूत राजकीय पक्ष होता. मात्र मागील काही वर्षात या पक्षाची मोठी वाताहात झाली आहे. केंद्रातील सत्तेसह अनेक राज्यातील सत्ताही त्यांच्या हातून गेली आहे. याशिवाय सक्षम नेतृत्वाअभावी काँग्रेसची नौका हेलकावे खात आहे. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारले असले तरी त्यांच्या बळावर काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही मान्य करतात.
मोदींचा वारू रोखण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रितपणे आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही, याची जाणिव काँग्रेससह अन्य विरोधकांनाही झाली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे लोकसभेत संख्याबळ अन्य विरोधकांच्या तुलनेत अधिक असले तरी नेतृत्वाअभावी काँग्रेसची बाजू लंगडी पडते आहे. त्यामुळे मोदींना रोखण्यासाठी सर्व विरोधकांची महाआघाडी करण्याचे निश्चित झाले, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ही आघाडी होणेही कठीण दिसते. अन्य विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्वाकांक्षा आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाला होणारा विरोध लक्षात घेता काय करता येईल यावर काँग्रेसच्या नेत्यांचे विचार मंथन सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आघाडीत नेतृत्वाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वसमावेशक नेता म्हणून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची चाचपणी काँग्रेसने सुरु केलेली आहे.
सोनिया गांधींनी डिनर डिप्लोमसीला आमंत्रित केलेल्या नेत्यांकडून आघाडीच्या नेतृत्वाबाबतच साशंकता व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी राहुल गांधी यांनी शरद पवारांशी बंद दरवाजा आड दीर्घकाळ चर्चा केली. छोटे पक्ष काँग्रेसचे नेतृत्व मानतील, पण जे महत्वाकांक्षी नेते आहेत त्यांच्याकडून नेतृत्वाचा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशातील मुलायमसिंग यादव, मायावती, आंध्र प्रदेशातून चंद्राबाबू नायडू, डाव्या आघाडीकडून सीताराम येचुरी हे नेते शरद पवारांच्या नेतृत्वाला पाठिंबा देऊ शकतात, त्यामुळे काँग्रेसने शरद पवारांबाबत चाचपणी सुरू केलेली दिसते. शरद पवारांचे सर्वच राजकीय पक्षांत असलेले संबंध आणि ऐनवेळी संख्याबळ जमवण्याची क्षमता यावरून शरद पवारांच्या नेतृत्वावर एकमत होण्याची शक्यता काँग्रेसला वाटत आहे.

या चिमण्यांनो, परत फिरा..
उतरती कळा लागलेल्या काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी पक्षातून बाहेर गेलेल्यांना परत बोलवावे लागणार आहे. १९ वर्षापूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांना वेळप्रसंगी काँग्रेसमध्ये आणण्याचेही प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांनी भविष्यात काँग्रेसची धुरा बिगर नेहरु, गांधी परिवाराकडे जाऊ शकते असे संकेत दिले होते.

वातावरण बदलण्याची ताकद
नवी दिल्लीत काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या ८४ व्या अधिवेशनात भाजपला रोखण्याचा काँग्रेसने केलेला निर्धार, उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपला दिलेला झटका आणि विळा भोपळ्याचे सख्य असलेले बसपा-सपा यांची युती पाहता आपणही सारे एक होऊन असा चमत्कार करू शकतो हा विश्वास ब-यापैकी विरोधकांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे ‘आता नाही, तर कधीच नाही’ या न्यायाने मोदी विरोधासाठी सर्वांची मोट बांधण्याचे शिवधनुष्य काँग्रेसने उचलले असून शरद पवारांच्या नावाची चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.