Home » Uncategorized » *लातूर-बीड-उस्मानाबादच्या आमदारकीसाठी भाजपकडून सुरेश धस यांच्या नावाची चर्चा*

*लातूर-बीड-उस्मानाबादच्या आमदारकीसाठी भाजपकडून सुरेश धस यांच्या नावाची चर्चा*

*लातूर-बीड-उस्मानाबादच्या आमदारकीसाठी भाजपकडून सुरेश धस यांच्या नावाची चर्चा*

 

तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षांमधून उमेदवारांच्या चर्चा आणि मतदार याद्यातील आकडेमोड सुरु झाली आहे.

 

बीड :  डोंगरचा राजा

“””””””””””””””””””””””””””

तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षांमधून उमेदवारांच्या चर्चा आणि मतदार याद्यातील आकडेमोड सुरु झाली आहे. तीनवेळा प्रतिनिधीत्व केल्याने मतदार संघाची ‘नस ना नस’ अवगत असलेले विद्यमान आमदार माजी मंत्री दिलीपराव देशमुख प्रकृतीच्या कारणामुळे यावेळी निवडणुक रिंगणात उतरण्यास उत्सुक नसल्याचे कळते.

 

दिलीपराव देशमुख यांच्यासारखे मातब्बर रिंगणात नसतील तर विजय सहज मिळविता येईल अशी अशा भाजप बाळगून आहे. विजयी मतांचा बंपर गठ्ठाच जिल्ह्यात असल्याने माजी मंत्री सुरेश धस यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. आठ दिवसांपासून मुंबईत याबाबत खलबते सुरु असल्याचे कळते.

 

पुर्वीच्या मराठवाडा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे विभाजन होऊन लातूर – उस्मानाबाद – बीड या तीन जिल्ह्यांचा हा मतदार संघ झाला. यामध्ये एकदा दिवंगत लोकनेते बाबुराव आडसकर यांनी विजय मिळविला. अस्सल ग्रामीण बोलीभाषा असलेल्या बाबुराव आडसकर यांनी ‘हाबाडा’ शब्दाला राजकीय शब्दकोषात जागा मिळवून दिली. या मतदार संघातील विजयानंतर ‘तीन जिल्ह्याच टिकूर (काठी) आपल्या हातात आहे, कामाची आता कसलीच काळजी करु नका’ हा कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेला विश्‍वास देखील जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला.

 

उस्मानाबाद जिल्ह्याचे नरेंद्र बोरगावरकर यांनीही या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. बीड व उस्मानाबाद या जिल्ह्याला बाबुराव आडसकर आणि नरेंद्र बोरगावकर यांच्या माध्यमातून संधी मिळाल्यानंतर हा मतदार संघ मागच्या 18 वर्षांपासून लातूरकरांच्या ताब्यात आहे.

 

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले.  सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. विलासराव देशमुख आणि  गोपीनाथराव मुंडे यांच्यातील मैत्रीच या बिनविरोध निवडीमागचे कारण ठरले होते.

 

त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत दिलीपरावांना विजयासाठी फार कसरत करावी लागली नाही. भाजपने एखादा नामधारी उमेदवार दिल्याने निवडणुकीचा केवळ सोपस्कार पार पाडला जायचा आणि दिलीपराव देशमुख सहज विजयी होत. तसे, विलासराव देशमुख यांचा या भागात असलेला राजकीय दबदबा, स्वपक्षासह इतर पक्षातील नेत्यांसोबत असलेले स्नेह आणि वैयक्तीक दिलीपराव देशमुख यांचा संपर्क यामुळे हे शक्‍य व्हायचे.

 

राजकीय तत्व पाळणारे दिलीपराव देशमुख हे शिस्तीचे राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपला स्थानिक विकास निधीही सर्वत्र पोहचेल याची खबरदारी आपल्या कार्यकाळात घेतली. मात्र, आता प्रकृतीच्या कारणामुळे दिलीपराव देशमुख यांनी निवडणुक रिंगणात उतरण्यास नकार कळविल्याची माहिती आहे. आजघडीला एक हजारांच्या घरात मतदार संख्या असलेल्या या तीन जिल्ह्यात सर्वाधिक मतदार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे आहेत.

 

मात्र, हा आकडा तांत्रिक ठरण्याची शक्‍यता आहे. कारण, मधल्या काळात बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी आणि दिलीपराव देशमुख यांचा नकार या दोन बाबींमुळे या मतदार संघात प्रथमच झेंडा फडकविण्याची संधी आणि आशा भाजप बाळगून आहे. दरम्यान, बीड जिल्हा परिषदेत सत्ता मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

कायम भाजपच्या संपर्कात असलेल्या धस यांचा पक्षात अद्याप अधिकृत प्रवेश झालेला नसला तरी सुरेश धस नेहमीच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या व्यासपीठार जाऊन त्यांचे थेट समर्थन करताना दिसतात. या निवडणुकीच्या माध्यमातून प्रवेश आणि पुनर्वसन असा योग सुरेश धसांच्या नशिबी येणार असा दावा त्यांचे समर्थक करतांना दिसतात.

 

दरम्यान, मागच्या आठवड्यापासून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि मंत्री पंकजा मुंडे या दोघांच्या धसांनी भेटी घेतल्या आहेत. तत्पुर्वी त्यांनी या तीनही जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना भेटूनही चाचपणी केली आहे. कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांचे बंधू अरविंद निलंगेकर  यांचे नावही भाजपकडून पुढे येत आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा केंद्रबिंदु बीड ठरणार असल्याने देवेंद्र फडणवीस, संभाजी पाटील निलंगेकर आणि पंकजा मुंडे यांच्या सहमतीतून धसांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल असे मानले जाते.

 

तीन टर्म या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिलीपराव देशमुख यांनी एकदा बिनविरोध तर दोन वेळा सहज विजय मिळविलेला आहे. तीनही जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या मातब्बर नेत्यांशीही सलोख्याचे संबंध आहेत. मागच्या निवडणुकीवेळी या मतदार संघात राष्ट्रवादीच्या मतांची संख्या अधिक असतानाही दिलीपराव देशमुख यांचा राजकीय राबता लक्षात घेऊन राष्ट्रवादीने ही जागा दिलीपराव देशमुख यांच्यासाठी कॉंग्रेसला सोडली होती.

 

यावेळीही कॉंग्रेसच्या मतांची संख्या राष्ट्रवादीपेक्षा कमी असली तरी दिलीपराव देशमुख यांनीच आघाडीकडून निवडणुक लढवावी अशी गळ त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून घातली जात आहे. दिलीपराव देशमुख यांनी शब्द टाकला तर तीन्ही जिल्ह्यातील स्थानिक आघाड्यांसह, अपक्ष आणि काही राजकीय गटांची मते दिलीपरांव देशमुख यांच्या पारड्यात पडू शकतात. पण दिलीपराव देशमुखांचा नकार कायम राहिला तर ही जागा राष्ट्रवादीकडे घेऊन माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील किंवा लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आणि पुण्याला उद्योजक असलेले सुभाष जगदाळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशीही चर्चा आहे.

 

तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी – कॉंग्रेसची मते अधिक असली तरी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची घडी विस्कटलेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील नगर पालिकेचे अनेक  सदस्य भाजपवासी झालेले आहेत. तर, बीडमध्येही खुद्द सुरेश धस भाजपचे उमदेवार नसले तरी त्यांच्या समर्थकांची पन्नासवर मते भाजपलाच मिळू शकतात.

 

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनाही पक्षातील एका गटाने दुखावलेले आहे. या दोघांच्या समर्थकांच्या मतांची संख्या 40 च्या पुढे आहे. त्यामुळे त्यांची मते मिळविण्यासाठी पक्षातील जेष्ठांनी त्यांना शब्द टाकावा लागेल आणि पुन्हा आगामी विधानसभेच्या उमेदवारीचा शब्दही द्यावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.