*मंत्रालयात चर्चा आर.आर.आबांच्या कन्येच्या विवाह निमंत्रण पत्रिकेची !*
आँनलाईन /डोंगरचा राजा
“”””””””””””””””””””””””””””””””””
छोटे – मोठे राजकीय कार्यकर्ते, उद्योजक, सेलिब्रिटी, शिक्षणसम्राट अशा मान्यवरांच्या कुटुंबातील विवाहाच्या निमंत्रणपत्रिका मंत्री व उच्चपदस्थांकडे नेहमीच येत असतात. आकर्षक, जाडजुड, रंगबिरंगी…अशा या महागड्या निमंत्रण पत्रिका पाहूनच संभाव्य शाही विवाहासोहळ्याची रसभरीत चर्चा मंत्रालयात रंगत असते. गेल्या चार – पाच दिवसांपासून विधानभवनात एका लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची चर्चा रंगली आहे. पण ही पत्रिका चर्चेत आली ती तिच्या अतिशय साधेपणामुळे!
ही लग्नपत्रिका एखाद्या सामान्य कुटुंबांतील विवाह सोहळ्याची असावी असे पाहताक्षणीच वाटते. पण हातात घेतल्यानंतर ती माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांची कन्या स्मिता हिच्या विवाह सोहळ्याची असल्याचे लक्षात येते. पत्रिकेवरून नजर फिरत असताना वाचणा-यांच्या डोळ्यासमोर आबांचे साधेपण चटकन तरळून जाते. आबांच्या साधेपणाला साजेशी वाटावी अशीच ही निमंत्रण पत्रिकाही साधीच छापण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्यांत स्मिता व आनंद यांचा साखरपुडा झाला होता. या लग्नगाठी जुळवून आणण्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. हा विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटी या ठिकाणी होणार आहे. पत्रिकेत निमंत्रक म्हणून कै. आर. आर. आबांच्या आई भगिरथी, पत्नी आमदार सुमनताई, बंधू सुरेश इत्यादींची नावे आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून शरद पवार यांचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या स्मिता यांचा विवाह आनंद थोरात यांच्याशी १ मे रोजी होणार आहे. आनंद थोरात हे माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आहेत. आनंद यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले असून पुण्यात ते सध्या बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत.