*परळीच्या शिष्टमंडळाने घेतली ना.पंकजा मुंडेंसह मुख्यमंत्र्यांची भेट *
आँनलाईन / डोंगरचा राजा
बीड जिल्हयाचे विभाजन करतांना परळी जिल्हयाची निर्मिती करून येथील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी परळी येथील सर्वपक्षीय नेत्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून केली.
परळी हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक तीर्थक्षेत्र असून औष्णिक वीज निर्मिती केंद्र, रेल्वे, विविध शासकीय कार्यालये याठिकाणी आहेत. हे शहर आता राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आले असून दळणवळणाची साधने तसेच पाण्याची उपलब्धता देखील येथे आहे. परळी जिल्हा करावा ही या भागातील जनतेची जुनीच मागणी आहे. बीड जिल्हयाचे विभाजन करतांना परळी जिल्हयाची निर्मिती करून येथील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मागणीचे निवेदनही त्यांना देण्यात आले. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यावेळी उपस्थित होत्या.
_समितीसमोर प्रस्ताव मांडू – मुख्यमंत्री_
————————————
परळी जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या समितीसमोर ठेवून याबाबत त्यांचे मत जाणून घेवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले. जिल्हा निर्मितीचा विषय शिष्टमंडळातील सर्वपक्षीय नेत्यांनी अतिशय मुद्देसूदपणे मुख्यमंत्र्यां समोर मांडल्यानंतर त्यांनी परळीच्या नेत्यांचे कौतुक केले. या शिष्टमंडळात भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, काॅग्रेसचे राजेश देशमुख, रिपाइंचे धम्मानंद मुंडे, व्यापारी महासंघाचे माऊली फड, शेख अब्दुल करीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजीराव धर्माधिकारी, शिवसेनेचे अतुल दुबे, मनसेचे वैजनाथ कळसकर, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. मधूसुदन काळे, डाॅ. हरिश्च॔द्र वंगे, डाॅ. सुर्यकांत मुंडे, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. भारत घोडके, वकील संघाचे अॅड. राजेश्वर देशमुख, वैजनाथ जगतकर, नगरसेवक पवन मुंडे, प्रा. दासू वाघमारे, शमशोद्दीन खतीब, प्रकाश जोशी आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.