Home » Uncategorized » *सरकारच्या चार वर्षांच्या कामाचे वाभाडे काढणे हे आमचे कामच आहे! – अजित पवार*

*सरकारच्या चार वर्षांच्या कामाचे वाभाडे काढणे हे आमचे कामच आहे! – अजित पवार*

*सरकारच्या चार वर्षांच्या कामाचे वाभाडे काढणे हे आमचे कामच आहे!

– अजित पवार*

 

डोंगरचा राजा आँनलाईन /मुंबई

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील उर्वरित काळात सरकारला घेरण्यासाठी योग्य नीती ठरवण्यासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्तावित हल्लाबोल आंदोलनच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष *सुनील तटकरे, विधिमंडळ नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे उपनेते जयदत्त आण्णा क्षिरसागर,*  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष  दिलीप वळसे पाटील, भास्कर जाधव, शशिकांत शिंदे, हेमंत टकले,  जितेंद्र आव्हाड आदी वरिष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. तर उपस्थितांमध्ये दोन्ही सभागृहातील मान्यवर आमदार होते.

 

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधिमंडळात सरकारच्या खोटारडेपणावर व नाकर्तेपणावर बोट ठेवत पक्षाची नीती स्पष्ट केली. तसेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विधानाचा समाचारही आपल्या भाषणात घेतला. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसे व राष्ट्रवादीच्या युतीबद्दलचे केलेले वक्तव्य अतिशय बालिश असे आहे, राज ठाकरे यांनी पवार साहेबांची एक मुलाखत किंवा भेट घेतली म्हणजे दोन पक्षांची युती होणार, असा बालिश विचार निरुपमच करू शकतात. असं सुनील तटकरे याप्रसंगी म्हणाले.

 

विधिमंडळ नेते अजित पवार यांनीही आपल्या आक्रमक शैलीत सरकारवर प्रहार केला. सरकारकडून कामकाज रेटून नेण्याचे काम चालू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाल्यापासून मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री गंभीर दिसत नाहीत. गेल्या चार वर्षांतील सरकारच्या कामाचे वाभाडे काढणे, हे आपल्या सर्वांचे काम आहे, असे सांगत अजितदादांनी उपस्थित आमदारांमध्ये जोशपूर्ण वातावरण निर्माण केले.

 

अजित पवार पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मतदारसंघातील जागा विरोधी पक्षाने जिंकल्या. बिहारमध्येही लालुप्रसाद यादव यांच्याविरोधात रण उठवूनही आरजेडीने पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. एकंदरीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात देशभर वातावरण निर्माण झाले आहे. हल्लाबोलच्या चौथ्या टप्प्यात ग्रामीण भागासोबतच पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांमध्येही हल्लाबोल आंदोलन होणार आहे. शहरी भागातही बरेच प्रश्न आहेत. या प्रश्नांवरही राष्ट्रवादी पुढच्या काळात आक्रमक राहील.

 

राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जलसंपदा खात्याची चर्चा आज होती. मुंबै बँकेच्या भ्रष्टाचाराचीही आज आपल्याला चर्चा करायची होती. पण शिवसेनेने मेस्माच्या त्यांच्या कालच्या भूमिकेवरून घुमजाव करत आज गदारोळ घातला. त्यामुळे बिझनेस गुंडाळण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे का,  अशी शंका घ्यायला जागा आहे.

 

ते पुढे म्हणाले की, हल्लाबोल आंदोलनाच्या तीनही टप्प्यात ज्या प्रकारे आपल्याला यश मिळाले. त्याप्रकारची मेहनत पश्चिम महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात आपल्याला करायची आहे. शहरी भागात अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. नागरी प्रश्नांच्या बाबतीत अधिक सतर्क राहावे लागणार आहे. बेरोजगारीचा प्रश्न अतिशय उग्र झाला आहे.

 

या सर्व प्रश्नांवर येणाऱ्या काळात काम करत संघटना बळकट करण्याचेही काम आपल्याला करायचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.