* कृषी महोत्सवास चौथ्या दिवशीही गर्दी *
पशुप्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
बीड, दि.21 :- बीड जिल्हा कृषी महोत्सवाच्या चौथ्या दिवशीही कृषी महोत्सव व पशु प्रदर्शन पाहण्याकरिता शेतकरी, युवा शेतकरी व महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.आंबाजोगाई परिसरातील व बीड जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातून आलेल्या हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद दिसुन आला. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय खरेदी-विक्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खरेदीदार म्हणून एडीएम कंपनीचे प्रवीण शेळके, सोयाबीन संशोधक व रूची कंपनीचे दिलीप कुलकर्णी, क्रिएटिव्ह अँग्रो कंपनीचे कंपनीचे अध्यक्ष अभिमान अवचर, अँग्रो उन्नति कंपनीचे अध्यक्ष सोपान गर्जे, युवाशक्ती कंपनीचे व्यवस्थापक पुरुषोत्तम चिलपिंपरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापित झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष, सदस्य, सचिव व इतर सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चासत्रात दर्जेदार निर्यातक्षम अंबा उत्पादन व विक्री या विषयावर कृषी विज्ञान केंद्र डिघोळअंबाचे शास्रज्ञ नरेंद्र जोशी यांनी मार्गदर्शन केले, तसेच ऊस पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत कृषी विद्यावेत्ता, वनामकृवि परभणीचे अरुण गुट्टे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी बी बिटके उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शन प्रकल्प संचालक आत्मा बी एम गायकवाड यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पणन तज्ञ प्रसाद भोसले यांनी केले व आभार प्रकल्प उपसंचालक आत्मा पी. आर. चव्हाण यांनी मानले.
महोत्सवाच्या निमित्ताने भव्य पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, या प्रदर्शनामध्ये जातिवंत देशी गोवंशाच्या लाल कंधारी, सेहवाल तसेच गावरान देशी गाई, वळूंचे तसेच संकरीत फुले त्रिवेणी, होलदेव गायींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे कडकनाथ कोंबडी, जातीवंत पांढरा शुभ्र घोडा, जातीवंत कृष्णवर्णीय घोडी, विदेशी वाणांचे श्वान प्रदर्शनात समाविष्ट करण्यात आले होते. अंबेजोगाई परिसरातून तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार तालुक्यातून जातीवंत पशूंना घेऊन पशुपालक कृषी महोत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते. पशुप्रदर्शनास युवा शेतकऱ्यांची गर्दी उसळलेली होती. यंत्रसामग्री व कृषी अवजारे यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ट्रँक्टर्सचे वितरण प्रकल्प संचालक बि. एम. गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उद्या कृषी महोत्सवाचा शेवटचा दिवस असून कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी महोत्सव समिति, प्रकल्प उपसंचालक प्रबोध चव्हाण, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्या चमुने केले आहे. स्टॉलधारकांकडून दि. 20 मार्चच्या सायंकाळपर्यंत विविध बाबींची जवळपास 60 लाख रुपयांची विक्री झाल्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गोपीनाथ पवार व पंकज जोशी यांनी माहिती संकलित करून सांगितले.
-*-*-*-*-