आंबेडकर स्मारकाचे काम तीन वर्षांत पूर्ण करणार
निविदा प्रक्रिया राबवून स्मारकाच्या बांधकामाचे कंत्राट शापूरजी अॅण्ड पालनजी कंपनीला दिले आहे.
विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: March 20, 2018 3:56 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम सुरू झाले असून पुढील तीन वर्षांत ते पूर्ण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
या संदर्भात काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ऑक्टोबर २०१५ मध्ये इंदू मिलच्या जमिनीवर प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले; परंतु अजून त्याचे काम सुरू झाले नाही, त्याबाबत नेमकी काय स्थिती आहे, अशी विचारणा रणपिसे, जनार्दन चांदूरकर, संजय दत्त, हेमंत टकले, प्रकाश गजभिये आदी सदस्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी त्यावर सविस्तर माहिती दिली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून इंदू मिलची संपूर्ण जमीन आंबेडकर स्मारकासाठी राज्य सरकारने ताब्यात घेतली. निविदा प्रक्रिया राबवून स्मारकाच्या बांधकामाचे कंत्राट शापूरजी अॅण्ड पालनजी कंपनीला दिले आहे. त्यासंबंधीचा कार्यारंभ आदेशही देण्यात आला असून स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली आहे. साधारणत स्मारकाचे काम पूर्ण व्हायला तीन वर्षांचा कालावधी लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.