गेवराई : प्रतिनिधी
अज्ञात वाहनाने एका २७ वर्षीय पादचारी तरुणास जोराची धडक देऊन झालेल्या या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील सिरसदेवी जवळ रविवारी सकाळी उघडकीस आली.
संजय सातपुते (वय 27 वर्ष रा.सिरसदेवी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेवराई तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र- २२२ वरील सिरसदेवी पासून एक किलोमीटर अतंरावर यादव वस्ती आहे. या वस्तीवरुन संजय सातपुते हा शनिवारी रात्री उशिरा सिरसदेवी कडे पायी घरी जात असतांना पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये सदरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला आहे. हि घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.