Home » Uncategorized » देव तारी त्याला कोण मारी ?

देव तारी त्याला कोण मारी ?

अवघ्या एक वर्षाचे बालक चालत्या बसमधून बाहेर पडले..
▪ रस्त्याने जाणाऱ्या १०८ रुग्णवाहीकेच्या चालकाचे लक्ष गेल्याने बाळाचा वाचला जीव
परळी / प्रतिनिधी
बसच्या खिडकीत उभे असलेले एक वर्षाचे बालक आदळ्याने बसच्या बाहेर फेकल्या जाऊन रस्त्यावर पडल्याची घटना आज दि. ९ रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास घडली. परळी -पंढरपूर ही बस कन्हेरवाडी घाटाजवळ असताना ही  घटना घडली. परंतु, बाळाचे दैव बलवत्तर असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या १०८ रुग्णवाहीकेच्या चालकाचे रस्त्याच्या कडेला पडलेल्या बाळाकडे लक्ष गेल्याने तातडीने उपचार मिळून बाळाचा जीव वाचला. या ह्रदयद्रावक घटनेने अनेकांचे मन हेलावले.
या बाबत अधिक माहिती अशी कि, सुरळवाडी (ता. गंगाखेड) येथील रहिवासी महिला रेखा बाळासाहेब गेतगे ही एक वर्षाचा मुलगा प्रेमला घेऊन परळी -पंढरपूर (बस क्र. एम.एच.१४ बी. टी. २११४) या बसमधून प्रवास करीत होती. उसतोडणी कामगार असलेल्या गेतगे कुटुंबातील लोक आपल्या गावाकडून पुन्हा कारखान्याला जात होते. ही बस परळी बसस्थानकावरून निघून कन्हेरवाडी जवळच्या घाटात असताना बसच्या खिडकीत उभा असलेला प्रेम आदळ्याने बसच्या बाहेर फेकल्या जाऊन रस्त्यावर पडला. बाळाच्या आईच्या आणि इतर नातेवाईकांनी थांबवेपर्यंत बस बरीच पुढे निघून गेली होती. नेमके याच वेळी परळीहून अंबाजोगाईकडे रुग्ण घेऊन येणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेचे चालक सचिन मुंडे यांचे लक्ष रस्त्याच्या कडेला धुळीत पडलेल्या बाळाकडे गेले. त्यांनी ताबडतोब गाडी थांबवून बाळाकडे धाव घेतली. रुग्णवाहीकेतील डॉ. प्रवीण शिंदे यांनी बाळाची तपासणी करून तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. स्वराती रुग्णालयात बाळाची तपासणी करण्यात आली. सुदैवाने बाळाला फक्त किरकोळ जखमा झाल्या होत्या. आवश्यक ते उपचार करून बाळाला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.