पाच जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास आष्टी पोलीसांनी ठोकल्या बेड्या..
▪अनेक वर्षांपासून देत होता पोलिसांना चकवा; पाठलाग करून साथीदारासह घेतले ताब्यात
आष्टी : प्रतिनिधी
बीड, सोलापुर, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे या पाच जिल्ह्यांमध्ये धुमाकुळ घालणारा अट्टल दरोडेखोर आटल्या ईश्वर भोसले यास आष्टी पोलीसांनी जिवाची बाजी लावुन अथक परीश्रमानंतर ताब्यात घेतले आहे. मागील अनेक दिवस तो पाच जिल्हातील पोलीसांना गुंगारा देत होता. अनेक साथीदारासह टोळी तयार करुन दरोडे,जबरी चोरी, घरफोडी सारखे घटना, प्राणघातक हल्ला करुन लुट करणाऱ्या दरोडेखोर टोळीचा म्होरक्या अटल्या भोसले यास मोठया शिताफिने सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले. यापुर्वी त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर हल्ला करुन तो पळुन गेलेला होता, मात्र पोलिसांनी यावेळी सर्व तयारीनिशी व मोठा शिताफीने सापळा रचुन त्यास बेड्या ठोकल्या.
महिनाभराच्या परीश्रमानंतर आष्टी पोलिसांच्या पदरी यश पडले आहे. आटल्या आणि त्याचा साथीदार ईश्वर गणा भ्सोले हे दोघे कानडी शिवारातील अज्ञात स्थाळावरून बेलगाव मिरजगाव मार्गे पहाटेच्या वेळी निघणार असल्याची माहिती आज पहाटे आष्टी पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तयार केली आणि ते कानडी परिसरात दबा धरून बसले. पण आटल्या मोटार सायकलवर भरधाव वेगाने मिरजगावकडे आणि तिथून पुढे हा मिरजगाव कडून कर्जत श्रीगोंदा कडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु ठेवला. आटल्या आणि ईश्वर दोघेजण श्रीगोंदा गावाच्या पुढे असलेला ढोरमोह साखर कारखाना समोरचे रेल्वे गेट क्रॉस करून जात असतांना पोलिसांनी त्यांना आवाज दिला. पोलिसांना पाहून वेगाने गाडी पळविण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी घसरली आणि दोघेही दरोडेखोर खाली पडले. तेवढ्यात पाठलाग करणारे पोलीस शिपाई गायकवाड आणि दराडे यांनी त्यास झडप घातली तर पथकातील इतरांनी तिथे येत त्यांना बेड्या ठोकल्या.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली, सहा. फौजदार कांबळे, पोलीस कर्मचारी नरवडे, अनिल सुंबरे, अनिल आगलावे, विकास राठोड, पांडूरंग दराडे, सोमनाथ गायकवाड, राकेश लोहार, प्रदीप पिंपळे, रियाज पठाण, गोविंद काळे, सचिन कोळेकर व दक्ष नागरीक कुमार लोंढे, पप्पु साळुंके यांनी पार पडली. आटल्या ईश्वर भोसले याने त्यांच्या साथीदारांचे मदतीने टोळी निर्माण करून पाच जिल्ह्यात दहशत निर्माण केली होती. परंतु, आष्टी पोलिसांच्या धाडसी कारवाईने आतापर्यंत एकूण ७ दरोडेखोर पकडल्याने मोठया प्रमाणात घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये घट झाली आहे.