सुख म्हणजे काय असतं.? -एस.एस.देशमुख

0
12

सुख म्हणजे काय असतं.? -एस.एस.देशमुख

“सुख म्हणजे काय असतं” याची अनुभूती सध्या घेतोय.. आमच्या माणिकबागेतील नारळाच्या सावलीत खाटेवर पडून टपोरया चांदण्याचा थंडगार मोकळ्या हवेचा आनंद घेतोय..हा आनंद स्वर्गसुखापेक्षा कमी नाही..

शेतातलं वातावरण मस्तय.. सभोवताली चांदण पसरलंय.., रातकिडयांची किरकिर , गोठ्यात बांधलेल्या गायी – बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा लयबध्द आवाज सोडला तर परिसरात निरव शांतता पसरलेली..मोबाईल फ्लाईट मोडवर टाकल्यानं दिवसभर खणखणणारी ती कंटाळवाणी रिंगही विसावलीय.. सोबतीला आमचा टॉमी खाटेच्या बाजुला शांत पहुडलाय …पुर्वी मला कुत्री आवडायची नाहीत.. मात्र टॉमीनं लळा लावलाय.. मी माणिकबागेत आलो की, टॉमी क्षणभरही माझा पिच्छा सोडत नाही…. आत्ताही बाजुलाच पहुडलाय.. शांतपणे..सध्याच्या मतलबी जगात हा टॉमीच मला विश्वासार्ह, जीव लावणारा साथी वाटतो.. म्हणून असेल कदाचीत माणिकबागेत मी बराचवेळ त्याच्याबरोबर घालवतो.. बरं वाटतं..

खरं तर मराठवाड्यात आजच प्रचंड उन पडतंय.. एप्रिल – मे मध्ये पारा 45 पर्यत जातो की काय? अशी भिती वाटतेय.. परवा दिवसभर उनात होतो.. त्यामुळं आज आळस, थकवाच होता.. घरीच लोळत पडलो होतो.. कशातच उत्साह वाटत नव्हता..काही काम करायचीही इच्छा होत नव्हती.. त्यामुळं तालुक्याला जायचंही टाळलं होतं.. उन कमी झाल्यानंतर सायंकाळी लवकरच माणिकबागेत जाऊन मावळतीच्या सूर्याचा आनंद घेत बसलो.. दिवसभर प्रखर उन ओकणारा तो सूर्य मावळतीला जाताना मात्र आल्हाददायक वाटत होता..आकाशातील वेगवेगळ्या छटा मोहक दिसत होत्या.. निसर्गाची ही लोभस रूपं मग कॅमेरयात टिपली.. तो सूर्य आपल्याच धुंदीत आपला रोजचा ठरलेला प्रवास पूर्ण करून उद्या परत येण्याचं वचन जगाला देत अस्ताला गेला.. थोडया वेळानं अंधार पडला आणि आकाशातून चंद्र सुखद चांदण्याचा वर्षाव करू लागला…ते टपोरं चांदणं सारा थकवा, कंटाळा पिटाळून लावणारं होतं.. थोडा अंधार पडला की शेतातील सोलरचे लॅम्प लागतात.. एरवी अंधारात या दिव्यांचा प्रकाश आवश्यक वाटतो..पण आज चांदण्या रात्रीमुळं मला हा कृत्रिम उजेड नकोसा झाला .. शेतातील सहकारयांना खाट दिव्याच्या प्रकाशापासून थोडी दूर नारळाच्या झाडाच्या जवळ टाकायला सांगितली.. त्यावर आडवा झालो आणि कितीतरी वेळ चंद्र न्याहळत आणि चांदण्या मोजत राहिलो.. निसर्गाची ही अनुभूती देशातल्या निवडणुकांचा कोलाहल, वैयक्तीक आयुष्यातील सारे प्रश्न, सारया कटकटी, विसरायला लावणारी नक्कीच होती..किती तरी वेळ असाच पडून राहिलो..

थोड्या वेळानं आठवलं घरी आई एकटीच आहे..

मला निघावं लागतंय..

पण खरंच आजची रात्र खरया सुखाची अनुभूती देणारी, चित्त प्रसन्न करणारी, हवीहवीशी वाटणारी अशीच रात्र होती..

एस.एम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here